मुंबई -कोरोना विषाणूचा प्रसार सुरू असताना मुंबईकरांना तसेच अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना इच्छित स्थळी पोहचवण्याचे काम बेस्टने केले. कोरोनामुळे बेस्टमधील अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या 97 'कोविड योद्ध्या' कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बेस्ट प्रशासनाने 50 लाखांची आर्थिक मदत केली आहे. तर 78 जणांच्या वारसांना नोकरी देण्यात आली असल्याची माहिती 'बेस्ट' महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
बेस्ट आली धावून -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसांतच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला. याच दरम्यान मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर व घरी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याकाळात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्टच्या बसेस सुरू केल्या. तसेच एसटी बसेसही भाडेतत्वावर घेतल्या.
३५६१ कर्मचाऱ्यांना कोरोना -
मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यावेळी मुंबईतील लोकलसह इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद करण्यात आली होती. लोकल बंद असताना बेस्ट रात्रंदिवस रस्त्यावर धावून मुंबईकरांना सेवा दिली. सेवा देताना बेस्टमधील परिवहन आणि विद्युत विभागातील एकूण 33 हजार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 3561 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 97 कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. पालिकेने या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही नोकरीचा आधार दिला आहे.
पालिकेकडून ५० कोटी -
कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यासाठी पालिकेने 50 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर अजूनही काही प्रलंबित प्रकरणात मदत करण्यासाठी पालकेने संबंधित समितीकडे काही प्रस्तावबाबत निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. असे 'बेस्ट' समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी सांगितले.
अशी आहे आकडेवारी -
एकूण कर्मचारी - 33 हजार
कोरोनाची लागण - 3561
कोरोना मात केली - 3435
50 लाखांची मदत दिली - 97
'बेस्ट'ने नोकरी दिली - 78
हेही वाचा -पुण्यातील 17 बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल