मुंबई - शहरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये राहून नागरिकांनी उत्सव साजरा केला. पालिकेला मुंबईकारांनी चांगली साथ दिल्याने महापौर व पालिका आयुक्तांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. गणेशोत्सवादरम्यान २४६ विसर्जन स्थळी १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या दरम्यान संकलित करण्यात आलेल्या २ लाख ६५ हजार ९८९ किलो निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईकरांचे आभार -
कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्रीगणेशोत्सव हा उत्सवाचे पावित्र्य जपत शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाला आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, बृहन्मुंबई व मुंबई उपनगरे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, सर्व संबंधीत संस्था आणि मुंबईकर नागरिकांचे महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आभार मानले आहेत.
१ लाख ५८ हजार मूर्त्यांचे विसर्जन -
यंदाच्या श्री गणेशोत्सवात संपूर्ण मुंबईतील ७३ नैसर्गिक स्थळे आणि १७३ कृत्रिम तलावांमध्ये सुमारे १ लाख ५८ हजार २२९ श्री गणेशमूर्तींचे व ६ हजार ५३२ गौरी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यानुसार एकूण १ लाख ६४ हजार ७६१ मुर्त्यांचे विसर्जन श्रीगणेशोत्सव काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापैकी ७९ हजार १२९ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले आहे. तर उर्वरित ८५ हजार ६३२ इतक्या संख्येतील मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक विसर्जन स्थळी करण्यात आले आहे. कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या ७९ हजार १२९ मुर्त्यांपैकी ७५ हजार ६८७ या घरगुती स्तरावरील मूर्ती होत्या. तर उर्वरित ३ हजार ५०२ गणेशमूर्ती या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या होत्या. कृत्रिम विसर्जन स्थळी मुर्त्यांचे विसर्जन करण्यास मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.