मुंबई -राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या धनंजय महाडीक यांनी महाविकास आघाडीच्या संजय पवार यांना धूळ चारली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काटें की टक्कर होती. मात्र, फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे संपूर्ण महाविकास आघाडी सरकार सपशेल फेल ठरल्याचे दिसून आले. संजय पवार यांचा पराभव आघाडीच्या जिव्हारी लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटणार आहेत.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत महाविकास आघाडीची तीन मते बाद करावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर महाविकास आघाडीकडून आक्षेप घेतला. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या संपूर्ण गोंधळात नऊ तास निकाल रखडला होता. अखेर मध्यरात्री अडीच वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. तीन वाजता काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी 44 मताने विजयी झाले. पाठोपाठ संजय राऊत 41 मतांनी बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी बाजी मारली. पाठोपाठ भाजपचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे विजयी झाले.
सहाव्या जागेसाठी काटें की टक्कर -राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडीक यांच्यात चुरस पाहायला मिळाली. पवार यांच्याकडे पहिल्या पसंतीच्या 33 मतांची आघाडी होती. तर महाडीक यांना 27 मते होती. मात्र, दुसऱ्या पंसतीच्या मतांमध्ये 14 मतांची आघाडी घेतली. तर संजय पवार यांना दुसऱ्या पंसतीचा एकही मत न मिळाल्याने पवार यांचा महाडीक यांनी दारुण पराभव केला. सहाव्या जागेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे मल्लिकार्जून खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोर लावला होता. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारत, महाविकास आघाडीला तोंडघशी पाडले आहे.