मुंबई :राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा यंदा रडवतो ( Onion Literally Makes You Cry ) आहे. प्रतिक्विंटल केवळ आठशे ते हजार रुपये कांद्याला दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या दरातील ( Onion Market Rate ) घसरण थांबवावी आणि कांद्याला वाहतुकीसाठी अनुदान मिळावे, यासाठी राजकीय पक्षांनीही ( Political Parties Demanding ) सरकारकडे मागणी ( Political Parties Demand to Goverment ) केली आहे. कांद्याला निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादनावरील खर्चदेखील निघत नाही.
कांदा उत्पादनात कुटुंबाची गुजराण होणे अशक्य :प्रकाश भोसले हे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांची तीन एकर शेती आहे. या शेतीत ते कांद्याचे पीक घेतात. प्रकाश भोसले सांगतात की, "दरवर्षी कांद्याला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळत असल्याने त्यांना कुटुंबाची गुजराण करणे शक्य होत होते. मात्र, यंदा कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, हा प्रश्न उभा राहिला आहे. कांद्याचा एकरी खर्च एक लाख रुपयांच्या आसपास जातो. कांदा काढण्यासाठी दहा हजार रुपयांचा खर्च लागतो. मात्र, तेवढे उत्पन्न मिळत नाही. जर बाजारात दर पडला, तर सगळे कष्ट वाया जातात," असे भोसले सांगतात.
निर्यातबंदी उठवली नाही तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल : "नाशिकचे शेतकरी बाजीराव खैनाळ यांनीसुद्धा आपली व्यथा मांडताना सांगितले की, कांदा उत्पादनाला खूप खर्च येतो. त्यामानाने बाजारभाव न मिळाल्याने कुटुंबाचे पोषण कसे करावे , हीच मोठी समस्या आहे. जर सरकारने कांद्याच्या दरातील घसरण थांबवली नाही आणि निर्यातबंदी उठवली नाही, तर यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जाईल," असे बाजीराव खैनाळ यांनी माध्यमांना सांगितले.
नाशिक कांदा उत्पादनात आघाडीवर :राज्यात तसेच देशात यंदा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याचे दर कोसळले असून, प्रतिक्विंटल केवळ आठशे ते हजार रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळत आहेत. नाशिक हा जिल्हा कांद्याचा राज्यातील सर्वात मोठा उत्पादक जिल्हा आहे. साधारणत: ३० टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते.