मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे यांना वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुंबई विद्यापीठाला जाग आली आहे. मुंबई विद्यापीठाने याबाबत एक निवेदन जाहीर करत ग्रंथालयातील जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच, अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रीया लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा -BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
पुस्तकांचे होणार स्कॅनिंग-
जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाची इमारत ही १९७५ ला तयार करण्यात आली होती. या ज्ञान स्त्रोत केंद्राची (विद्यापीठ ग्रंथालय) ग्रंथ संपदा ७ लाख ८० हजार एवढी आहे. या ग्रंथालयात काही देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने व त्यांच्या उपयोगाची नसलेली अनेक ग्रंथ, वर्तमानपत्रे देणगी म्हणून दिलेली होती. तसेच, काही पुस्तके विक्री अभावीही मोठ्या प्रमाणात या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. या ग्रंथालयातील अनेक पुस्तके ही जीर्ण आणि कालबाह्य झालेली आहेत. जीर्ण आणि कालबाह्य झालेली पुस्तके ही वेगळी करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच, अनेक महत्वाच्या पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने रोबोटिक स्कॅनरद्वारे स्कॅनिंगची प्रक्रिया लवकरच हाती घेण्यात येणार आहे. उपयोगी नसलेली पुस्तके रद्दीमध्ये काढण्यासाठी गोणीत भरली असून रद्दीत विकण्याची प्रक्रीयाही सुरू आहे.