महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्राच्या नवदुर्गा : धुळ्यातील आदिवासी मुलीचा माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा 'असा' राहिला प्रवास, पाहा विशेष मुलाखत.... - माऊंट एव्हरेस्ट

ईटीव्ही भारत'ने नवरात्रीनिमित्त 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आज आपण 19 व्या वर्षी जगातील सर्वात उंच असे माऊंट एव्हरेस्ट सर करणारी चंद्रकला गावित या आदिवासी मुलीशी संवाद साधणार आहोत. गावात फक्त झाडावर चढणारी चंद्रकला अवघ्या नऊ महिन्यात माऊंट एव्हरेस्ट सर करते. हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास...

Exclusive interview - chandrakala gavit
chandrakala gavit

By

Published : Oct 9, 2021, 8:06 AM IST

प्रश्न - माऊंट एव्हरेस्टबाबत आपण ऐकतो. वाचतो. तुला कधी वाटलं होतं की आपण माऊंट एव्हरेस्ट सर करू?

उत्तर - मी माऊंट एव्हरेस्टबाबत काही ऐकलं नव्हतं. मात्र, मला डोंगरावर चढायची आवड आहे. माझ्या गावाच्या आजूबाजूला डोंगर आहेत. त्या डोंगरावर जायची मला सवय होती.

धुळ्यातील आदिवासी मुलीचा माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा 'असा' राहिला प्रवास

प्रश्न - आपल्या गावाबद्दल, तिथल्या परिस्थितीबद्दल सांगशील ?

उत्तर - धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात पांझरा नदीच्या काठी माझं छोटसं गाव आहे. तिथे निसर्गरम्य वातावरण आहे. एका देवीचा डोंगर आहे. तिथे आमचे जाणे येणे होते. ती सवय मला होती.

प्रश्न - मिशन शोर्यअंतर्गत तुझी माऊंट एव्हरेस्टच्या लढाईसाठी निवड झाली. तुझी निवड, प्रशिक्षण याबद्दल आम्हाला सांगशील ?

उत्तर - महाराष्ट्र शासनाच्या मिशन शौर्य या उपक्रमांतर्गत राज्यातील अनेक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. शाळेतील प्राचार्य प्रवीण ठाकरेंनी बोलावून यांनी सांगितलं. नववीपासून मी धावण्याचा सराव करत होते. आमच्या इथून दोन जणांना पाठवले. माझे प्रशिक्षण वर्धा येथे झाले. हैदराबाद येथेही माझे 5 दिवसाचे प्रशिक्षण झाले. यानंतर तिसरे प्रशिक्षण हे दार्जिलिंग येथे झाले. याठिकाणी आल्यानंतर 7-8 दिवस थांबले. यानंतर बर्फात पाठवण्यात आले. मला हेदेखील माऊंट एव्हरेस्टसाठी प्रशिक्षण घेत होते, याबाबत माहित नव्हते. बेसिक कोर्स माझा दार्जिलिंगमध्ये झाला. यानंतरचे अॅडव्हान्स्ड प्रशिक्षण सिक्किम येथे झाले. यानंतर आम्ही लेह-लडाखला रवाना झालो.

प्रश्न - तुझं बालपण कसं गेलं? आई वडीलांबद्दल आम्हाला सांगशील?

उत्तर - आईबाबा शेती करतात. मोलमजुरी करुन त्यांनी मला मोठं केलं. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. घरच्यांना मी माऊंट एव्हरेस्टबाबत सांगितलं नव्हतं. मला भीती होती की त्यांना सांगितलं की, तर ते मला पाठवणार नाही.

प्रश्न - तू काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना नोकरीसाठी निवेदन दिले होते. त्याचे पुढे काय झाले ?

उत्तर - मी नोकरीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यांच्याकडून अजून काही प्रतिसाद मिळाला नाही.

प्रश्न - अतिशय लहान वयात तू माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर केलस. शिखरावर पोहोचल्यावर तुला कस वाटलं ?

उत्तर - आम्ही काठमांडूला पोहोचल्यावर तेथील पर्वतांची बर्फाची उंची पाहून हे शिखर सर करणार का याबाबत मला शंका होती. पण माऊंट एव्हरेस्टकडे पाहून ते पार करण्याची प्रेरणा मिळत होती. काहीही झाले तरीही ही मोहीम अर्ध्यात सोडायची नाही हे मी ठरवले.

प्रश्न - माऊंट एव्हरेस्ट सर करताना काही मृतदेह सापडले का ?

उत्तर - हो माऊंट एव्हरेस्ट चढताना आम्हाला बर्फात गोठलेले मृतदेह सापडले. ते पाहून पहिले भितीच वाटली होती. रस्त्याच्या बाजूला अनेक मृतदेह पाहून अनेक माणसेच बसल्यासारखेच वाटत होती.

ABOUT THE AUTHOR

...view details