मुंबई - पावर ग्रीडमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आदी परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा मोठा फटका आज अंतिम वर्षाच्या परीक्षांनाही बसला आहे. यामुळे सकाळच्या सत्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षेचे पेपर मुंबई विद्यापीठासोबतच अनेक महाविद्यालयांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाच्या सकाळच्या सत्रातील परीक्षांचे पेपर सकाळी दहा वाजता सुरू झाले होते. मात्र, बरोबर पंधरा मिनिटांच्या अंतराने या परिसरात वीज गायब झाल्याने असंख्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड झालेले पेपर सोडवता आले नाहीत. तर विजेचे नेमके कारण माहीत नसल्याने सुरुवातीला मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाची मुभा दिली होती. परंतु त्यानंतर वीज येत नसल्याचे लक्षात आल्याने आजच्या सकाळच्या सत्रातील पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात मुंबईतील के. सी. महाविद्यालयासोबतच इतर महाविद्यालयांचा समावेश आहे.