मुंबई - कोरोना आणि त्यानंतर सुरू असलेल्या लॉकडाऊनने लाखो लोकांना रस्त्यावरच जगण्यास भाग पाडले आहे. अशावेळी वांद्रे पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या शेल्टर होमने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त फरपट होत असलेल्या आणि बिहार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातून आलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना या शेल्टर होमने आधार दिला आहे. उत्तर भारतीय सेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून वांद्रे पूर्व येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी शेल्टर होम सुरू करण्यात आले आहे.
संघाच्या शाळेच्या हॉल आणि परिसरात या शेल्टर होममध्ये झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यासह आपल्या राज्यातील असे एकूण १३५ महिला, पुरुषांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे यात अनेक जण हे टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचारासाठी आले होते, परंतु लॉकडाऊनने त्यांच्यापुढे संकट उभे केले आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून आलेल्या आणि रक्ताचा कॅन्सर असलेल्या प्रमिला देवी यांच्यावर उपचार झाले होते आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी देणार इतक्यात देशभरात लॉकडाऊनची सुरुवात झाली. पत्नीला रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर आम्ही रस्त्यावरच राहिलो असल्याचे त्यांचे पती आनंदी पासवान यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आम्ही इकडे आलो असून इथे आम्ही सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.