महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम

प्राथमिक स्तरावर शाळा, महाविद्यालये बंद यानंतर कोरोनावर उपाययोजना म्हणून पहिली ते आठवीच्या परिक्षा रद्द, तर काही पेपर पुढे ढकलण्याचे निर्णय शिक्षण विभागाने घेतले. देशभरात लॉकडाऊन घोषित झाल्याने सीईटी परीक्षा आणि विद्यापीठांच्या परीक्षा देखील लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत हे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्याचे पहायला मिळत आहे.

ETV BHARAT Special Corona virus Lockdown disturb academic year
ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत

By

Published : Apr 10, 2020, 1:07 PM IST

Updated : Apr 10, 2020, 2:01 PM IST

मुंबई -कोरोनामुळे सुरुवातीला शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाले. हळुहळु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता याचा परिणाम शाळा, महाविद्यालयातील परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यांच्यावर देखील झाला. एप्रिल महिन्यात बहुतांश शाळांच्या परीक्षा होत असतात; तसेच अनेक स्पर्धा परीक्षा पार पडतात. मात्र, काही परीक्षा रद्द, काही स्थगित तर काही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्यामुळे एकूणच परीक्षा, निकाल आणि नवीन वर्षाच्या प्रवेशाचा यावर्षी गोंधळ उडणार आहे. तसेच 2020-21 हे शैक्षणिक वर्ष विस्कळित होणार असल्याचे दिसत आहे. तसेच या सर्व घडामोडींचा परिणाम राज्यातील लाखो विद्यार्थी, स्पर्धा परिक्षांचे उमेदवार, प्रशिक्षित बेरोजगार तरुण आणि पालक वर्गावर होत आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग आणि संबंधीत संस्थांकडून वेळोवेळी घेण्यात आलेले निर्णय...

1. शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिली होती.

2. कोरोनामुळे दहावी शेवटचा पेपर लांबणीवर; रद्द होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा एक पेपर लांबणीवर टाकण्यात आला आहे. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावीच्या भुगोल विषयाचा एक पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. राज्यातील जवळपास १७ लाख ६५ हजारांहुन अधिक विद्यार्थांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामुळे हा पेपर आताच्या परिस्थितीत घेणे अवघड असल्याने तो रद्द होण्याची शक्यता आहे.

3. कोरोनामुळे महाविद्यालय, विद्यापीठ आणि सीईटीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलले

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. स्वतः उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे जाहीर केले.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

4. MPSC च्या एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षा लांबणीवर, कोरोनामुळे आयोगाचा निर्णय

कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नसल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC एप्रिल आणि मे महिन्या होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. येत्या 26 एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि 10 मे रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे आयोगाने ही माहिती दिली आहे. या परीक्षा पुढे केव्हा होतील त्याची माहिती आयोगाने दिलेली नाही. परीक्षांच्या नव्या तारखा या योग्य वेळी जाहीर केल्या जातील, असे आयोगाने म्हटले आहे.

5. 'वर्क फ्रॉम होम' नंतर आता 'लर्न फ्रॉम होम'

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी 'लर्न फ्रॉम होम' म्हणजेच घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, या संदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याच्या सूचना गायकवाड यांनी दिल्या आहेत.

'विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासाठी टी.व्ही., रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा. शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेले ई-मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावे. सर्व अधिकारी यांनी लक्ष निर्धारित काम करावे' अशा सूचना वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिल्या आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थी, स्पर्धा परिक्षांचे उमेदवार, प्रशिक्षित बेरोजगार तरुण आणि पालक चिंतेत...

आपल्या परीक्षा आणि त्यासाठीच्या तारखा कधी जाहीर होतील, त्यातून आपली सुटका कधी होईल, अशा मानसिकतेत राज्यातील लाखो विद्यार्थी अडकले आहेत. दुसरीकडे राज्य शिक्षण मंडळाची केवळ बारावीची परीक्षा पूर्ण झाली असली, तरी तिचे पेपर वेळेत तपासण्यासाठी कोरोनामुळे अडचणी उभ्या केल्या आहेत. राज्य शिक्षण विभागाचा दहावीचा एक पेपर राहिल्याने ही परीक्षा आणि त्याचा निकालही लांबणीवर पडणार आहे. सीबीएसईचे लाखो विद्यार्थी राज्यात असल्याने त्यांचे अनेक पेपर होणे बाकी आहेत, यामुळे राज्यात लाखो विद्यार्थी आपल्या परीक्षा आणि त्यानंतरच्या निकालामुळे चिंतेत सापडले आहेत.

औद्योगिक व्यवसाय व प्रशिक्षणच्या अंतर्गत येणाऱ्या आयटीआयच्या परीक्षा थांबल्या आहेत. त्यातच या कालावधीत मागील वर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा होणार होती. मात्र, तीही पुढे गेल्याने या विद्यार्थ्यांना आपले पुढील वर्ष ही वाया जाईल की काय अशी भीती वाटत आहे. तर नियमित विद्यार्थ्यांचे आपल्या परीक्षा कधी होतील याकडे लक्ष लागले आहे. तसेच प्रशिक्षण पुर्ण झालेल्या लाखो तरुणांपुढे नोकरी नसल्याने आणि विविध स्पर्धा परिक्षा रखडल्याने अनैश्चिक बेरोजगारीची वेळ आली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे कॅम्पस झाले आहे. त्यांना नोकऱ्याही ऑफर झाल्या आहेत. मात्र त्याच नोकऱ्यांवर आता कोरोना संकटामुळे गदा आली आहे. त्यामुळे पुढे आपले काय होणार या चिंतेत असे विद्यार्थी आहेत.

कोरोनामुळे विविध परीक्षा लांबणीवर...

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची लॉटरी जाहीर झाली असूनही कोरानामुळे पुढील प्रवेश प्रकिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो पालकांची आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी मोठी धाकधूक सुरू आहे. तसेच दहावी परिक्षा आणि बारावीचे पेपर तपासणी यांच्या अनिश्चिततेमुळे पाल्यांच्या पुढील प्रवेशाची चिंता देखील पालकांना लागली आहे. एकंदरीत पालकांची नजर सध्या कोरोनाचे संकट दूर होईल याकडे स्थिरावली आहे.

या काळात विद्यार्थ्यांकडे उपलब्ध पर्याय...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांचे तसेच विद्यापीठांचे शैक्षणिक कामकाज सध्या थांबले आहे. मात्र, केंद्र शासनाच्या व इतर नामांकित खाजगी शिक्षण संस्थांच्या संकेतस्थळावरून घर बसल्या विविध मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य आहे, लाखो विद्यार्थ्यांनी घरातून ऑनलाईन पद्धतीने अनेक पदवी व पदविका घेतल्या आहेत. त्यामुळे घरी बसून वेळ वाया घालू नका तर आपल्या ज्ञानात भर झाला, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील शाळा-महाविद्यालयांना सध्या सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी घरी बसून काम करत आहेत. या सर्वांसाठी नाविन्यपूर्ण ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑनलाईन व्हिडिओ पाहून त्यावरील प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावे लागतात. काही कृतीयुक्त प्रश्न असतात. त्यामुळे डोक्याला चालना देऊन विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावेत,असे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Last Updated : Apr 10, 2020, 2:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details