मुंबई - महापालिकेच्या माध्यमातून मुंबईमध्ये इंग्रजी माध्यमाच्या 'मुंबई पब्लिक स्कुल' शाळा चालविल्या जातात. या शाळांमधून विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून चांगले शिक्षण मिळावे, यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि इंग्रजीमधूनच शिक्षक पदवी घेतलेल्या ८७६ इंग्रजीतज्ज्ञ शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अशी माहिती पालिकेच्या शिक्षण समितीमध्ये प्रशासनाकडून दिल्याचे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ६३ शाळा 'मुंबई पब्लिक स्कुल' नावाने चालविल्या जातात. या शाळांमधून पालिकेच्या इतर भाषिक शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. इतर भाषेतील नियुक्त केलेले शिक्षक विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण चांगल्या प्रकारे देऊ शकत नसल्याने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि इंग्रजीमधूनच शिक्षक पदवी घेतलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि इंग्रजीमधूनच शिक्षक पदवी घेतलेल्या ८७६ इंग्रजीतज्ज्ञ शिक्षकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. या पोर्टलमधून उपलब्ध ८७६ इंग्रजीतज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.