मुंबई - बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मैत्रिणीचे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियरला मुंबई पोलिसांच्या युनिट 11ने अटक केली आहे. बोरीवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीला अनोळखी व्यक्तीने बनावट इन्स्टाग्रामवरून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शिवीगाळ करत व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले होते. पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याने तो पीडित मुलीच्या भावास पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
मैत्रिणीचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट बनवणाऱ्या इंजिनियरला अटक
बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मैत्रिणीचे खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक इंजिनियरला मुंबई पोलिसांच्या युनिट 11ने अटक केली आहे.
यासंदर्भात पीडित तरुणीने 6 सप्टेंबर रोजी बोरीवली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर यासंदर्भात पोलीस तपास करत होते. हे प्रकरण क्राइम ब्रँच युनिट 11कडे आल्यानंतर तांत्रिक तपास केला असता 15 सप्टेंबर रोजी ठाण्यातील कळवा येथून एका 24 वर्षीय युवकाला ताब्यात घेण्यात आले होते. इंजिनियर असलेल्या या युवकाची चौकशी केली असता, सदर आरोपी युवक हा 2013- 14मध्ये विरार येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याची पीडित मुलीशी मैत्री झाली होती. दोघेही एकाच ठिकाणी पदवी घेत असल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीसुद्धा झाली होती. इंजिनियरिंग शिक्षण संपल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात हे दोघे होते. पीडित तरुणीने तिच्या एका मित्राचे फोटो तिच्या ई-मेल आयडीवर स्टोअर करून ठेवले होते. मात्र, पीडित तरुणीच्या ई-मेल आयडीचा पासवर्ड आरोपीला मिळाल्यामुळे त्याने हे फोटो पाहिले.
पीडित तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत असलेले फोटो पाहून राग आल्यामुळे आरोपीने सुडापोटी पीडित मुलीचा बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट बनवले होते. पोलिसांच्या तपासा दरम्यान आरोपी युवकाने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली असून, या गुन्ह्यात त्याने वापरलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.