मुंबई -वाढत्या इंधनदरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी (Electric Vehicles) करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या वर्षी राज्यभरात २९ हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत तब्बल ४० टक्क्यांनी वाढ (Electric Vehicles Sale Hike) झाल्याची माहिती परिवहन विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून केलेल्या प्रयत्नाला महाराष्ट्रात यश येताना दिसून येत आहे. याबाबदचा ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...
अशी आहे आकडेवारी-
गेल्या काही वर्षात सतत इंधनदरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईची झळ सोसावी लागू नये म्हणून आता अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी देखील गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे २०२० आणि २०२१ हे वर्षे कोरोनामुळे सोडल्यास, तर २०१८ मध्ये राज्यात ६ हजार ३०० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. तर २०२१ मध्ये राज्यात २९ हजार ८६० वाहन खरेदी करण्यात आल्या आहेत. म्हणजे २०१८ च्या तुलनेत २०२१ मध्ये २३ हजार ५६० वाहन नोंदणी राज्यातील आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. सध्या राज्यात ५२ हजार ८२ इलेक्ट्रिक वाहन धावत आहेत.
मुंबईमध्ये सार्वधिक इलेक्ट्रिक वाहन -
मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या मुंबई मोठ्या प्रमाणात त इलेक्ट्रिक वाहनाची संख्या वाढत आहेत. आकडेवारी जर बघितली तर राज्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांची संख्या मुंबईत आहेत. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये १ हजार ३६७, वडाळा आरटीओत ७८०, अंधेरी आरटीओत १ हजार ११२ आणि बोरिवली आरटीओत ९२६ असे ३ हजार १८५ वाहनांची नोंदणी झाली आहेत. सध्या परिस्थितीत मुंबईमध्ये सहा हजारापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन आहेत.