मुंबई- राज्यातील चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नाशिक, सोलापूर, बुलढाणा आणि नागपूर या चार जिल्हा बँकांचा यात समावेश असून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला आहे.
राज्यातील १३ पेक्षा अधिक जिल्हा बँकांच्या निवडणुकांची मुदत मागच्या वर्षी संपुष्टात आलेली आहे. मात्र महात्मा फुले ज्योतिबा शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेची अंमलबजवणी करण्यासाठी प्रथम तीन महिन्यांसाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोविड-१९ या साथीमुळे बँकाच्या निवडणुका १५ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान, ९ आॅगस्ट रोजी शासनाने ज्या बँकांची मुदत संपली आहे व ज्या बँका निवडणुकीस पात्र आहेत, अशा सर्व जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सहकारी विभागाला दिले होते.