मुंबई - लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. यामध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांची देखील निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत निवडणूक सदिच्छा दूत
तृतीयपंथी गौरी सावंत यांची निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गौरी सावंत या तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क बजावण्याबाबत सांगणार आहेत.
गौरी सावंत यांच्या नेमणुकीमुळे अधिकाधिक तृतीयपंथी शेवटच्या टप्प्यातील नावनोंदणी करण्यास मदत होईल. येत्या काही दिवसात गौरी सावंत या तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन मतदानाची आवश्यकता, मतदानाचा हक्क बजावण्याबाबत सांगणार आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या नवमतदारांसह अधिकाधिक मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगामार्फत नामवंत खेळाडू, चित्रपट कलावंत, साहित्यिक आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
२००४, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी अशी नोंद नव्हती. परंतु २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. त्यानंतर या वर्गवारीत ९१८ मतदारांची नोंद झाली होती. ५ वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आता ही संख्या २ हजार ८६ इतकी झाली आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई उत्तर आणि मुंबई पूर्व या ४ मतदार संघात अनुक्रमे ११३, १८४, ३२४ आणि १२३ तृतीयपंथीयांची नोंद झाली आहे. तर मुंबई उत्तर या मतदार संघातून सर्वाधिक ३२४ तृतीयपंथीयांची नोंद झाली आहे.