मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने राज्यातील सत्तासंघर्ष वाढत आहे. दुसरीकडे राज्य विधिमंडळाने आता शिवसेनेच्या अजय चौधरी यांची गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली. शिंदे गटाला हा मोठा दणका दिला आहे. विधिमंडळाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाची धाकधूक आणि भाजपसोबत जाण्यासाठी अडचणी वाढणार आहे. ( Eknath Shinde )
एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे सरकार टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. तसेच बंडखोर एकनाथ शिंदे पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी करत शिवसेनेने शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली. एकनाथ शिंदेंनी गट नेते असल्याचा दावा शिंदे गटाने केला. या पार्श्वभूमीवर अनेक दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशातच आता शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनील प्रभू यांना विधीमंडळाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय समितीचे अवर सचिव घ. ज्ञा. देबडवार यांनी तसे पत्र शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयाला दिले आहे. बंडखोर शिंदे यांच्या पुढे आता अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नरहरी झिरवळ यांनी केले स्पष्ट -बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिले. शिवसेनेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला. परंतु, शिंदे यांनी शिवसेना विधिमंडळाच्या गटनेते पदी स्वतःची तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली. तसे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले. काही दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. कायद्यानुसार, पक्षप्रमुखांनी गटनेता नेमायचा असतो. गटनेत्यांनी प्रतोद यांची नेमणूक करायची असते. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेते पदी केली आहे. ते पत्र स्वीकारल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले.