जळगाव- भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आज खडसे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही भेट होणार असल्याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
आपल्याला पक्षाकडून अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांनी अलीकडे आपल्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे.
गेल्या पंधरवड्यात मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंना प्रवेश देण्याबाबत आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत चाचपणी देखील केली होती. त्यात स्थानिक नेत्यांनी संमिश्र मते मांडत खडसेंबाबत पक्षाला फायदाच होण्यात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत खडसेंच्या प्रवेशाबाबत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
एकनाथ खडसे हे मुंबईत असून ते शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, याबाबत खुद्द खडसे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात देखील खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेनंतर मोठ्या हालचाली होताना दिसत आहेत.
हेही वाचा :पार्थ यांच्या ट्विटवरून शरद पवारांनी 'ही' दिली प्रतिक्रिया