मुंबई - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मंत्रिपद काढून भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीत राजकीय पुनर्वसन होणार असल्याचे सूत्राने सांगितले. आव्हाड यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक घेतली आहे.
एकनाथ खडसेंना गृहनिर्माणमंत्रीपद मिळण्याची शक्यता; शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांची मनधरणी - Sharad Pawar meeting with Jitendra Awhad
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाने मंत्रिमंडळासह राष्ट्रवादीत मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा गृहनिर्माण मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांना इतर जबाबदारी राष्ट्रवादीकडून दिली जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांना महत्त्वाचे मंत्रीपद देण्यासाठी राष्ट्रवादीकडून निर्णय घेतला जाणार आहे. मागील आठ दिवसांपासून आपले मंत्रीपद जाणार असल्याची कुणकुण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसात माध्यमांशी बोलण्याचे टाळले होते. त्यांच्याविरोधात पक्षातील काही बड्या नेत्यांनाही तक्रारी केल्या होत्या. अशा परिस्थितीत आव्हाड यांची पवारांकडून मनधरणी करण्यात आली आहे. आव्हाड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन त्यांना इतर जबाबदारी राष्ट्रवादीकडून दिली जाण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्राने व्यक्त केली आहे.
आव्हाड यांच्याकडे असलेले गृहनिर्माण हे खाते शिवसेनेला देऊन त्यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादीकडे घेतले जाण्याची शक्यता आहे. यासाठी चर्चाही सुरू झाल्या आहेत. शिवसेनेकडे असलेले कृषी खाते हे राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये याविषयीची नाराजी असल्याचे बोलले जात आहे.