मुंबई - राष्ट्रवादीचा कार्यकर्ता खांद्यावर झेंडा घेवून सर्वसामान्य लोकांचे काम करतोय त्यात आता नाथाभाऊंची भर पडली आहे. आमची बैठक झाली. त्यांनी पक्षात येताना एकही अपेक्षा व्यक्त केली नाही. पक्षात येऊन कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केली आहे. वाहिन्यांवर अनेक बातम्या येत आहेत परंतु मंत्रिमंडळात काहीही बदल होणार नाहीत, जे आहे तसेच राहणार आहे. सर्व प्रदेशाध्यक्ष जयंतरावांच्या नेतृत्वाखाली काम करतील असा विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. आज आनंदाचा दिवस आहे. नवीन पिढी पक्षात सहभागी होत आहे. प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय. परंतु आम्हाला धुळे, जळगाव, नंदुरबार येथे अधिक काम करायचे आहे. पक्षात अजून गती यायची असेल तर नाथाभाऊंची गरज आहे, असे सांगतानाच खानदेश हा गांधी, नेहरू यांच्या विचाराने वाढलेला आहे. कॉंग्रेसच्या विचाराचा हा खानदेश आहे. पक्षावर आणि विचारांवर निष्ठा असलेले लोक घराघरात आहेत. याशिवाय आलेल्या पाहुण्यांना आदराने खादीचा टॉवेल देणारा आणि खादीवर प्रेम करणारे जुनेजाणते लोक या जिल्ह्यात होते याची आठवण शरद पवार यांनी केली.