मुंबई- ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार होती. मात्र, देशमुखांनी पुन्हा एकदा ईडीला पत्र पाठवले आहे. पत्रात लिहिलंय की, ईडीला चौकशी करायची असेल तर ती ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून करावी. चौकशीसाठी कुठल्याही वेळी आपण तयार असल्याचे त्यांनी ईडीला कळवले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना अनिल देशमुख यांचे पत्र मिळाले आहे. परंतु त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
देशमुखांच्या वकिलांनी ईडीकडे सात दिवसांचा मागितला वेळ -
दरम्यान अनिल देशमुख यांच्या वकीलांकडून ईडीकडे सात दिवसांचा मागितला वेळ आहे. वेळ देण्याचा सर्वस्वी निर्णय हा ईडीकडे आहे. आज पुढचा दिलासा जरी मिळाला असला तरी ईडीने अद्याप देशमुखांना वेळ दिलेला नाही.
अनिल देशमुख यांच्या वकिलांची प्रतिक्रिया 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
नऊ तास चालली अनिल देशमुखांची चौकशी -
100 कोटी वसुली प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्या भोवती तपासाचा धडाका लावला आहे. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीतर्फे छापेमारी करण्यात आली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले होते. ही चौकशी सुमारे नऊ तास चालली. या पथकामध्ये एक महिला अधिकाऱ्यासह पाच जणांचा समावेश होता. दिवसभर चाललेल्या चौकशीत अनिल देशमुख यांची पत्नी, मुलगा सलील आणि त्यांची सून या सर्वांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली. यावेळी ईडीच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटलं होतं. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या वरळीतल्या सुखदा सोसायटीतल्या घरामध्ये तब्बल साडे अकरा तास ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु होते. दरम्यान या सर्च ऑपरेशन वेळी स्वतः अनिल देशमुख घरी उपस्थित होते.
बारमालकांची कबुली -
अनिल देशमुख यांच्या घरी तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीकडून मुंबईतील काही बार मालकांची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलीस खात्यातील गुन्हे शाखेचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझेला मुंबईतील 1 हजार 700 हून अधिक बार मालकांकडून 100 कोटी रुपये प्रति महिना वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणात ईडीच्या चौकशीमध्ये मुंबईतील जवळपास 10 बार मालकांना बोलावण्यात आले. यावेळी बारमालकांनी 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिल्याचे ईडीने म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोप -
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंह यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपयाच्या वसूलीचे टार्गेट दिले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मुंबई हायकोर्टाकडे पाठवली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले होते.