मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा ( Underworld don Dawood Ibrahim ) भाऊ इकबाल कासकर ( Iqbal Kaskar ) याच्या जवळच्या सहकारी मुमताज एजाज शेखच्या नावावरील ठाणे येथील 55 लाख रुपयाचा फ्लॅट अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) मंगळवारी (दि. 12 एप्रिल) जप्त केला आहे. इकबाल कासकरला फेब्रुवारी महिन्यात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग ( Money Laundering ) प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी इकबाल कासकरकडून ही माहिती मिळाल्यानंतर आज ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखालील ( PMLA act ) प्रकरणाच्या तपासात आज ईडीने ही कारवाई केली. इकबाल कासकर तसेच त्याचे गुंड मुमताज, इसरार अली जमील सय्यद यांनी हा फ्लॅट शहरातील बिल्डर सुरेश मेहता यांच्याकडून खंडणी म्हणून बळकावला होता, असेही ईडीने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी सप्टेंबर, 2017 मध्ये नोंदविलेल्या गुन्ह्याची ईडीने दखल घेतल्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक आणि मकोका ( Mcoca act ) कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये इकबाल कासकर, मुमताज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या विविध कलमांन्वये खंडणीसाठी नोंदवलेल्या गुन्ह्याच्यांच्या आधारे मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला.