मुंबई - महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना टॅब दिल्यानंतर आता पालिका शाळांमध्ये 'ई लायब्ररी' सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा एक भाग म्हणून सुरुवातीला २५ शाळांमध्ये ई लायब्ररी सुरु केली जाणार आहे. त्यासाठी पालिका १ कोटी ३१ लाख रुपये इतका खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेच्या २५ शाळांमध्ये सुरु होणार 'ई लायब्ररी'... हेही वाचा...पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या कामावर अमितची नजर
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे कमी करता यावे, म्हणून आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. पालिकेच्या शाळा डिजिटल असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पालिका शाळांमध्ये ई लायब्ररी सुरु केली जाईल असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पालिकेच्या २५ शाळांमध्ये ई लायब्ररी सुरु केली जाणार आहे. या ई लायब्ररीमुळे इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना छापील पुस्तक व इतर पुस्तके ध्वनी, चलचित्र, ग्राफिक्सचा माध्यमातून डिजिटल स्वरूपात संगणकात बघता येणार आहेत. शालेय पुस्तकांमधील धडे आणि इतर उपयोगी पुस्तके डिजिटल स्वरूपात उपलबध करून दिल्याने विद्यार्थ्यांना ती समजणे सोपे जाणार आहे.
हेही वाचा....कोरोना भयग्रस्त बाजारात १,९४१ अंशांनी पडझड; गुंतवणूकदारांना गमावले ७ लाख कोटी
पालिका शाळांमध्ये ई लायब्ररी सुरु करण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यात आयएनपी कॉम्पुटर टेक्नॉलॉजी आणि निशी इन्फोटेक यांनी भाग घेतला. आयएनपी कॉम्पुटरने कमी खर्च नमूद केल्याने त्यांना पालिकेच्या २५ शाळांमध्ये ई लायब्ररी सुरु करण्यासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सर्व करांसह पालिका आयएनपी कॉम्पुटरला १ कोटी ३१ लाख ६३ हजार ७२६ रुपये इतकी रक्क्म अदा करणार आहे. तास प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.