मुंबई - शहर आणि परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काही खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि कोकण परिसरातील सर्व शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, काही शाळा आगाऊ शिकवण्या घेण्यासाठी सुरु ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, मुंबईत सकाळपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळच्या सत्रातच या शाळा बंद करण्याचे आदेश महापालिका आणि शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. यानंतर या शाळांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह व शिक्षक शिवनाथ दराडे यांनी दिली.
हेही वाचा - LIVE : मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; १३०० नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी
आज सकाळपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसादरम्यान, सर्वाधिक पावसाची नोंद ही महापालिकेच्या पूर्व (अंधेरी पूर्व) विभाग कार्यक्षेत्रात झाली असून या परिसरात २१४.३५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. या खालोखाल दादर परिसर, वडाळा धारावी आणि रावळी कॅम्प परिसरात पाऊस पडल्याने या परिसरातील शाळांना सकाळच्या सत्रात सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यासोबतच कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, भांडुप, मालाड, कांदिवली आदी भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने परिसरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
हेही वाचा -ठाण्यात पावसाचे थैमान; रेल्वेसह जनजीवन विस्कळीत