मुंबई -मुंबई शहर मायानगरी म्हणून ओळखली जाते. मात्र, आता मुंबईची एक वेगळी ओळख हे उडती मुंबई अशी तयार होत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईमध्ये एनसीबी आणि मुंबई पोलीस अमली पदार्थ पथकाकडून ड्रग्स माफियांविरोधात मोठी कारवाई पाहायला मिळालेली आहे. ( Drugs Confiscation by Mumbai Police ) मुंबई पोलिसांनी या आठवड्यात 1400 कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी गेल्या दीड वर्षात 214 कोटी 69 लाख रुपये किमतीचे 05 हजार किलोंचे अमली पदार्थ जप्त केले असून, 13 हजार 178 आरोपींना अटक केली आहे. मुंबई ड्रग्जच्या बाबतीत पंजाब राज्याच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
या एकाच कारवाईवरुन मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल - मुंबई ड्रग्स माफीयांविरोधात एनसीबी आणि मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करताना दिसून आलेले आहेत. मुंबई पोलिसांनी याच आठवड्यात पाच जणांच्या टोळीकडून तब्बल 1 हजार 403 कोटी 48 लाख रुपये किमतीचे 701 किलो 740 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. टोळीचा म्होरक्या असलेल्या प्रविणकुमार सिंह (52) याने दोन वर्षात 2 हजार 600 कोटी रुपये किमतीच्या 1 हजार 300 किलो ड्रग्जची विक्री मुंबई प्रदेशात करून त्यातून निव्वळ 20 कोटींचा नफा कमावल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या एकाच कारवाईवरुन मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल होत असून, ड्रग्ज तस्करी विक्री आणि नशेखोरीचा हब बनल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
दरवेळी नवे आरोपी - महामुंबई परिसर ड्रग्ज माफियांच्या टार्गेटवर असून, आजघडीला किती ड्रग्ज एजंट मादकद्रव्यांची विक्री मुंबईत करतात याचा खुद्द पोलिसांनाही अंदाज नाही. एकाच वेळी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागासह स्थानिक पोलीस ठाणी, केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि अन्य काही विभागांकडून सतत कारवाई केली जात आहे. आणि दरवेळी नवे आरोपी, ड्रग्ज विक्रीची नवी पद्धती उघड होते. आता पकडल्या गेलेल्या प्रवीणकुमारने अंबरनाथमध्येच एमडी ड्रग्जची फॅक्टरी सुरू केली आणि नालासोपार्यात वितरण केंद्र काढले होते.
गांजाची लोकप्रियता मुंबईत शिगेवर पोहचली - मुंबई पोलिसांनी जानेवारी 2021 ते जून 2022 या गेल्या दीड वर्षांत तब्बल 12 हजार 561 गुन्हे दाखल करुन, तब्बल 214 कोटी 69 लाख रुपये किमतीचे 05 हजार किलोंचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणांत 13 हजार 178 आरोपींना अटक केली आहे. यात मुख्यत्वेकरुन एमडी ड्रग्जवरील कारवाई सर्वाधिक असून, त्या खलोखाल हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा आणि अन्य अमली पदार्थांवरील कारवाईचा समावेश आहे. बदलत्या काळानुसार पारंपरिक गांजा स्वरूप बदलून आता विदेशी गांजा किंवा जमीनविरहित म्हणजे फक्त पाणी आणि कार्बन वायूआधारे हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेल्या गांजाची लोकप्रियता मुंबईत शिगेवर पोहचली आहे.
कोकेन यांची क्रेझ कमी झालेली नाही - उच्चभ्रू वसाहतीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली मागणी यामागचे कारण असल्याचे म्हटले जाते. मु्ंबईतील नाईट क्लब, पब्स, रेव्ह पार्ट्यांमध्ये सेलिब्रेटींसोबतच धनाढ्यांची मुले सहभागी होत असल्याने, या पार्ट्यांमध्ये महागड्या ड्रग्जची विक्री होते. त्यामुळेच मुंबईत अजूनही हेरॉईन, चरस, कोकेन यांची क्रेझ कमी झालेली नाही. एलएसडी, एमडीएमल, एक्स्टसी गोळ्या, सिरप यांचीही मोठी मागणी असल्याचे पोलिसांनी सांगितले.