मुंबई - राज्यात सध्यातरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात नागरिकांमध्ये ८६ टक्के अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. तसेच, लसीकरण झाल्याने तिसरी लाट येईल आणि जाईल, ही लाट दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसेल, अशी माहिती डॉक्टरांसाठी कार्यरत असलेल्या मेडस्केप इंडिया संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुनीता दुबे यांनी दिली. तर, पावसाळा व गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या संपर्कात येऊन मुंबईत रुग्णसंख्या वाढू शकते, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा -फुकट्या प्रवाशांची आता खैर नाही, एसटीची तपासणी मोहीम
तिसऱ्या लाटेचे संकेत नाही
राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे, रुग्णसंख्या ३ ते ५ हजारांवर आली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने सध्यातरी राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, सणासुदीच्या काळात राज्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. लसीकरणाची गती वाढवली तर संक्रमण जास्त होणार नाही, असे मतही टोपे यांनी व्यक्त केले आहे.
तरीही कोरोना होऊ शकतो
मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून दुसरी लाट ओसरली आहे. मुंबईत सध्या ३०० ते ४०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. मुंबईत करण्यात आलेल्या पाचव्या सेरो सर्व्हेमध्ये ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये, तसेच लसीकरण करण्यात आलेल्या ९०.२६ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यादरम्यान चार महिन्यांत मुंबई आणि राज्याबाहेरील लोक आपल्या गावाकडे जातात. तसेच, गणेशोत्सव असल्याने अनेक चाकरमानी कोकणात गेले आहेत. पावसाळा संपत असल्याने, तसेच गणेशोत्सवानंतर हे सर्व नागरिक मुंबईत यायची सुरुवात होत आहे. हे नागरिक मुंबईत येताना कोरोनाचा प्रसार घेऊन येतात का, यावर आमचे लक्ष आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे सध्या शहरात असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होऊ शकते. अँटिबॉडीज असलेले किंवा लस घेतलेले नागरिक कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यांना विषाणूची लागण होऊ शकते. अँटिबॉडीज असल्या किंवा लस घेतली असली तरी सौम्य लक्षणे येऊ शकतात. यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले.