पुणे- भारतात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. यात 18 ते 40 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र लसीचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे काही राज्यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण स्थगित केले आहे. त्यासोबतच केंद्र सरकारने कोरोना झालेल्या रुग्णांना 90 दिवसानंतर लस दिली जावी, असेही र्देश दिले आहेत. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी आक्षेप घेतला आहे. 'कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांना 90 दिवसानंतर लस देणे हे धोकादायक असून या काळात त्यांना पुन्हा लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या धोरणाचा पुनर्विचार करावा', असे भोंडवे यांनी म्हटले आहे.
'कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी लसीकरण कधी करावे' -
एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला तर त्या व्यक्तीने लसीकरण केव्हा करायचे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी जेव्हा चर्चा झाली तेव्हा 9 महिन्यानंतर लस देण्यात यावी असे ठरवण्यात आले होते. मात्र या निर्णयानंतर देशातील काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला आणि त्यांनतर पुन्हा बदल करण्यात आले आहे. कोविशिल्ड लसीबाबत 90 दिवसांनी लसीचा निर्णय घेण्यात आला, त्यात जर एखाद्याला पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर त्याला दुसरा डोस घेता येऊ शकतो. पण कोवॅक्सीनबाबत मात्र असे नाही. जर एखाद्याला पहिल्या डोसनंतर कोरोना झाला तर त्याने दुसरा डोस कधी घ्यायचा, असा सवाल भोंडवेंनी केला.