महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केईएम रुग्णालयातील आंदोलन मागे; मागण्या पूर्ण करण्याचे रुग्णालय प्रशासनाचे आश्वासन

मुंबईतील केईएम रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम थांबवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. वैद्यकीय कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी त्यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र, आता संबंधित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

KEM hospital mumbai
मुंबईतील केईम रुग्णालय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरू

By

Published : May 26, 2020, 11:14 AM IST

Updated : May 26, 2020, 5:13 PM IST

मुंबई - महानगर पालिकेच्या केईएम रुग्णालयात आज सकाळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. एका कोरोना संशयित सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून चतुर्थ श्रेणी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी प्रशासनाचा जोरदार निषेध केला. मात्र, वेळीच रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने काही तासातच हे आंदोलन मागे घेण्यात आले.

केईममध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित असून कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अशात 24 मे रोजी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या एका सफाई कामगाराचा मृत्यू झाला. संबंधित कामगार मागील दहा वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहे.

मुंबईतील केईम रुग्णालय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरू

ताप येत असल्याने त्याने आपली ड्युटी कोरोना वार्डमध्ये लावू नये, अशी मागणी केली होती. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याचे त्याला कोरोना वार्डात काम करण्यास प्रवृत्त करण्यात आले. काही काळानंतर ताप वाढल्याने त्याने कळवा येथे 23 मे रोजी रक्त चाचणी केली. या अहवालात कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर 24 तारखेला प्रकृती खालावल्याने त्याला कळव्यावरून केईएमला आणण्यात येत होते. मात्र या ठकाणी येईपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

केईएममध्ये आणल्यानंतर नैसर्गिक मृत्यू असल्याची नोंद करण्यात आली. कोरोनाची सर्व लक्षणे असताना तसेच कोरोना वॉर्डमध्ये काम करत असताना मृत्यूची अशी नोंद झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले. संबंधिताच्या मृत्यूची नोंद कोरोनाबाधितांमध्ये करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी उचलून धरली. यामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्याला विम्याचा लाभ मिळेल. आज सकाळी 7 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू करत गोंधळ घातला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ लक्ष घालत सर्व मागण्या मान्य केल्याने आता आंदोलन मागे घेतल्याची माहिती म्युनिसिपल युनियनच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. मृत कर्मचाऱ्याला न्याय देण्यापासून ते पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची सोय नजीकच्या महात्मा गांधी रुग्णालयात करण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : May 26, 2020, 5:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details