मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत आणि प्रकरण किती खोलवर रुतले आहे, याची माहिती मिळते. या प्रकरणात विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना अटक करण्यात आली आहे. विनायक शिंदे याच्या घरातून एक डायरी जप्त करण्यात आली आहे. आता ही डायरीच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा करणार असल्याचे समजतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनायक शिंदे हा ठाणे आणि नवी मुंबई परिसरात वसुली करायचा आणि त्याच्या नोंदी या डायरीमध्ये लिहिलेल्या असायच्या.
डायरीत वसुलीची नोंद -
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयएच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी विनायक शिंदेची डायरी एनआयएने त्याच्या घरातून जप्त केली आहे. या डायरीतील नोंदीतून महत्त्वाची माहिती एनआयएच्या हाती लागली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विनायक शिंदे ठाणे आणि नवी मुंबईतील पब आणि बारमधून वसूली करायचा अशी माहिती एनआयएला मिळाली आहे.