महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धारावीकरांची कोरोनावर पुन्हा मात, सलग तिसऱ्या दिवशी केवळ 4 रुग्णांची नोंद - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मागील महिन्यात धारावीत दिवसाला 70 हून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवारनंतर आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी ४ रुग्ण आढळून आले आहेत.

dharavikars-beat-corona-again
dharavikars-beat-corona-again

By

Published : May 29, 2021, 8:30 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मागील महिन्यात धारावीत दिवसाला 70 हून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवारनंतर आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी ४ रुग्ण आढळून आले आहेत. याआधी धारावीत बुधवारी 3 रुग्ण आढळून आले होते. यामुळे धारावीकरांनी दुसऱ्यांदा कोरोनावर मात केली आहे.

धारावीत 29 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. 2 फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात 334 रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात 7 ते 11 हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत 8 मार्चला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. 18 मार्चला ही रुग्णसंख्या 30 वर जाऊन पोहचली होती. 11 एप्रिलला धारावीत 76 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे. त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात 1 मे ला 28 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. 10, 11, 13, 22 मे रोजी दिवसाला 9 रुग्णांची नोंद झाली आहे. 20 आणि 25 मे ला 7 रुग्णांची नोंद झाली आहे. 26 मे ला 3 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 27, 28 आणि 29 मे ला दरदिवशी 4 रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 6,810 वर गेली आहे. त्यापैकी 6422 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 29 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -


जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. 24 डिसेंबर, 22 जानेवारी, 26 जानेवारी, 27 जानेवारी, 31 जानेवारी, 2 फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

धारावी पॅटर्न -

मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत 1 एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी मॉडेल, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

मुंबईत 7 लाख कोरोना रुग्ण -

मुंबईत 7 लाख 3 हजार 461 कोरोनाचे एकूण रुग्ण आहेत. त्यापैकी 14 हजार 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 58 हजार 540 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 958 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 370 दिवस इतका आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details