मुंबई -धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा तिसऱ्यांदा राज्य सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुनर्विकासाला ब्रेक लागला आहे. मागील 16 वर्षांपासून धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली केवळ 'निविदा-निविदा' खेळ सुरू असल्याचे म्हणत आता धारावीकर आक्रमक झाले आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर धारावी बचाव आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आता दिवाळी झाल्याने आता धारावी बचाव आंदोलन कामाला लागले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प : रहिवाशांच्या जनजागृतीसाठी 'बैठकावर बैठका', धारावी बचाव आंदोलन सुरू - धारावी बचाव आंदोलन
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा सरकारकडून रद्द झाल्याने पुनर्विकासाला ब्रेक लागला आहे. आता धारावीत रहिवाशांच्या जनजागृतीकरता बैठकावर बैठका होत असून धारावी बचाव आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी माटुंगा लेबर कॅम्प येथे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. तर डिसेंबरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार असून त्याआधी रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी 248 बैठका घेण्यात येणार आहेत. तेव्हा आता धारावीकर पुनर्विकासाच्या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज झाल्याचे चित्र आहे.
तीनदा निविदा रद्द -
अशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे. ही धारावीची नकारात्मक ओळख बदलण्यासाठी राज्य सरकारने 2004 मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. 2009 मध्ये यासाठी पहिली निविदा काढली. पण ही निविदा प्रक्रिया पुढे गेलीच नाही आणि निविदा रद्द झाली. 2016 मध्ये दुसऱ्यांदा निविदा काढली गेली. पण या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही आणि ही निविदा ही रद्द करण्यात आली. त्यानंतर 2018 मध्ये निविदा काढण्यात आली. याला दोन बड्या कंपन्यानी प्रतिसाद ही दिला. यातील सेकलिंग कंपनीला कंत्राट मिळणार असे वाटत असतानाच रेल्वेच्या एका जागेचा समाविष्ट पुनर्विकासात करण्याच्या नावे आता काही दिवसांपूर्वी तिसऱ्यांदा निविदा रद्द करण्यात आली आहे. तर आता लवकरच चौथ्यादा निविदा काढली जाणार आहे.
धारावीकर नाराज -
16 वर्षे केवळ पुनर्विकासाचे स्वप्नच धारावीकरांना दाखवले जात आहे. पण प्रत्यक्षात काही हा प्रकल्प मार्गी लावलेला नाही वा एक वीट ही रचलेली नाही. अशात आता निविदेला प्रतिसाद मिळाल्याने प्रकल्प मार्गी लागणार असे वाटत असताना एका क्षुल्लक कारणाने निविदा रद्द करण्यात आली आहे असे म्हणत धारावीकर नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे आता धारावी बचाव आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे आंदोलनाचे प्रमुख आणि माजी आमदार बाबुराब माने यांनी सांगितले आहे. तर दिवाळीनंतर रस्त्यावरची लढाई सुरू करू असे माने यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता दिवाळी संपली असून रविवारपासून आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्प येथे एक बैठक पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर एक मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. पण त्याआधी लोकांमध्ये यासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी 248 बैठका घेण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात, गल्ली बोळात पोहचत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे बैठकावर बैठका घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एकूणच आता धारावीकर पुनर्विकासासाठी रस्त्यावर उतणार आणि आक्रमक भूमिका घेणार हे आता स्पष्ट होताना दिसत आहे.