मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेवर भाजपचे नेते कृष्णा हेगडे, मनसेचे नेते अमित धुरीसह इतर काही जणांना ब्लॅकमेल केल्याची तक्रार समोर आली. अशातच धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याकडून सप्टेंबर 2020 मध्ये मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये रेणू शर्मा व करुणा शर्मा यांच्या विरोधात ब्लॅक मेलिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. धनंजय मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांच्याकडून ही तक्रार बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली असून या तक्रारीमध्ये म्हटले आहे, की निवडणूक लढवून आमदार पद मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांना रेणू शर्मा व तिच्या बहिणीकडून पैशांसाठी ब्लॅकमेल केले जात होते.
धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर - शरद पवार
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून धनंजय मुंडे यांनी माझी व्यक्तिगत भेट घेऊन सर्व प्रकारची माहिती मला दिली असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत पक्षातील इतर जेष्ठ नेत्यांसोबत बोलून नंतर निर्णय घेण्यात येईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आतापर्यंत झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. पोलीस याबाबत तपास करत असून पोलिसांच्या निष्कर्षावर निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ''बाबरवर एफआयआर दाखल करा'', लाहोर न्यायालयाचा आदेश