मुंबई -समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आज (बुधवार) मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडेविरोधात तक्रार केली आहे. त्यात, गेल्या तीन महिन्यापासून मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट येथील त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्यास २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषणाचा इशाराही करुणा शर्मा यांनी दिला आहे.
कोण आहेत करुणा शर्मा ?
मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप केल्यानंतर करुणा शर्मा हे नाव प्रकाशझोतात आले. करुणा शर्मा ही मॉडल तरुणी होती व २००३ पासून तिचे धनंजय मुंडे यांच्यासोबत संबंध होता. बलात्काराच्या कथित आरोपानंतर त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका व करुणा शर्मा नावाच्या महिलेबाबत असणारे संबंध सोशल मीडियावर पोस्ट लिहून स्पष्ट केली. त्यात मुंडे यांनी म्हटले की, करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना माहित होती. आम्हा दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.
करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी आणि त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत. मात्र २०१९ पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिविताल धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. असे नमूद केले होते.
फेसबुकवर काय म्हणतात करुणा ?
आज माझा वाढदिवस आहे, परंतु माझ्या पतीने माझ्या मुलांना 3 महिने चित्रकूटमध्ये त्यांच्या बंगल्यात लपवून ठेवले आहे आणि मला भेटू, बोलूही देत नाहीत. राजकीय ताकदीचा दुरूपयोग केला जात आहे. रावणानेही इतका अत्याचार केला नसता.