मुंबई - एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, मी सत्तेबाहेर असेल, पण सरकार चालावे ही माझी जबाबदारी असेल, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होते. परंतु, केंद्रीय पातळीवर काही सूत्रे हलली आणि भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा आग्रह केला. त्यानंतर पक्षाचा आदेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ( Devendra Fadnavis Oath Deputy CM ) आहे.
जे. पी. नड्डा काय म्हणाले? -भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हे ठरवले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये असायला हवे आणि सरकारमध्ये पदभार सांभाळायला हवा. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने हे स्पष्ट सांगितले आहे, की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्रातील जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद लावावी आणि महाराष्ट्र एक विकसित राज्य होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे जे. पी. नड्डा यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देवेंद्र फडणवीसांना दोनदा फोन करुन सरकारमध्ये सहभागी होण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.