मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. सचिन वझे यांच्या विरोधात पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सचिन वझे अनेकांची नावं घेतील म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत, ते नेमके कोणाला वाचवत आहेत, असा सवाल देखील फडणवीस यांनी केला आहे.
विधानसभेत खडाजंगी -
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. सचिन वझेंवरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सभागृहात मनसुख हिरेन यांची हत्या झाली. त्यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. मनसुख यांची गाडी सचिन वझे हे वापरत होते हे सांगितलं. सचिन वझे आणि मनसुख सोबत असायचे हे देखील त्या बोलल्या आहेत. माझ्या पतीचा खून सचिन वझे यांनी केला आहे, असं त्या जबाबात आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की, सचिन वझे यांना पाठीशी घातले जातंय. हे प्रकरण स्पॉन्सर होतं का? सचिन वझेला बाजूला केलं तर इतरांची नावं येतील याला सरकार घाबरत आहे, असं फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा - पालघर जिल्हापरिषदेतील १५ तर जिल्ह्यातील चार पंचायत समितीतील १४ सदस्यांची पदे रद्द