महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन अनोखे विक्रम.. अन् नामुष्की

चार दिवसांपूर्वी पुन्हा शपथ घेतल्यावर आज बहुमताअभावी राजीनामा देण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर ओढवली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर जमा झाला आहे. मनोहर जोशी यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारा पहिला बिगर काँग्रेसी नेता म्हणूनही त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे.

mumbai
देवेंद्र फडणवीस

By

Published : Nov 26, 2019, 7:56 PM IST

मुंबई- महाराष्ट्राच्या सत्ताकारणात एखाद्या हॉलिवूडच्या पटकथेप्रमाणे किंबहूना त्याहूनही नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अर्थातच या घडामोडींचे केंद्रस्थान आहे राज्याचे मुख्यमंत्रीपद. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे राज्याच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला. यानंतर राज्यात महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेची मोट बांधली जात असताना देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर अजित पवारांना हाताशी धरत अचानक 'राजभवनाच्या साथीने' लोकशाहीला झोपलेल्या अवस्थेत ठेऊनच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, संख्याबळाअभावी आज राजीनामा देताना फडणवीस यांनी शरसंधान केले. परंतु, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या या बिगर काँग्रेसी नेत्याने आज वेगळ्याच विक्रमाला गवसणी घातली आहे.


निवडणूकपूर्व काळात मनोहर जोशी यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारा पहिला बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या गोटात आनंद साजरा करण्यात आला. २०१४ ते २०१९ या पाच वर्षात सरकार चालवून जनतेची काही प्रमाणात विश्वासार्हताही या सरकारने मिळवली. मात्र, चार दिवसांपूर्वी परत शपथ घेतल्यावर आज बहुमताअभावी राजीनामा देण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर जमा झाला आहे. शपथ घेतल्यावर त्यांना ४ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. म्हणजे केवळ ७८ तासांतच त्यांचे सरकार बरखास्त झाले. याआधी १९६३मध्ये माजी मुख्यमंत्री पी. के. सावंत यांचे सरकार १४ दिवसात बरखास्त झाले होते. फडणवीस हे मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्यानंतर विदर्भाचे प्रतिनिधीत्व केलेले चौथे मुख्यमंत्री होते.

  • देवेंद्र फडणवीस यांची थोडक्यात कारकीर्द-
  • फडणवीस हे ३१ ऑक्टोबर २०१४ ते ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री होते.
  • ६ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले.
  • त्यानंतर २३ नोव्हेंबरला शपथ घेतल्यावर चारच दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर पर्यंतच हे सरकार टिकले.

ABOUT THE AUTHOR

...view details