मुंबई - जनतेच्या सोयीसाठी हॉटेल व्यवसायिकांना त्यांचे किचन सुरू ठेवून घरपोच खाद्यपदार्थ देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील, असे पवार म्हणाले.
कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, कोरोनाबाबत आवश्यक स्वच्छता व सुरक्षितता बाळगावी लागणार असल्याचे ते म्हणाले. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असे पवारांनी सांगितले.