मुंबई -परवानाधारक ७१ हजार रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
२ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात परवानाधारक रिक्षा चालकांना सानुग्रह अनुदान देण्यात येत असून सुमारे ७१ हजार रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा परवानाधारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. उर्वरित परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. कोरोनाच्या निर्बंध काळात दुर्बल घटक व हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांना एकूण १०८ कोटी रुपये सानुग्रह अनुदानाचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले होते. राज्यात ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत आहे.
७१ हजार ४० रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान
परिवहन विभागामार्फत एक ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून ती दि. २२ मे २०२१ पासून परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरीता खुली करण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण २ लाख ६५ हजार ४६५ रिक्षा चालकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यापेकी ७१ हजार ४० रिक्षा चालकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १ लाख ५ हजार रिक्षा चालकांच्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम जमा करण्याबाबत NPCI (National Payment Corporation Of India) यांना कळविण्यात आले आहे, असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.