मुंबई - मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आक्षेप घेतलेली मतं आता नेमकी कोणती? हे कसे ओळखणार? भाजपकडून घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तो आक्षेप अमान्य करत निवडणूक प्रक्रियाही पूर्ण केली. त्यामुळे भाजप केवळ रडीचा डाव करत आहे, असा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. दरम्यान, मतमोजणी सध्या थांबवली आहे (Rajya Sabha Counting Delay). केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यावर मतमोजणी सुरू केली जाईल, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गुजरातमध्ये निवडणुकीदरम्यान मतं बाद करण्यात आली होती, असा दाखला भाजपकडून दिला जात आहे. मात्र, जो दाखला भाजपकडून दिला जात आहे, त्यामध्ये आक्षेप घेतलेल्या मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. पण आताच्या निवडणूक पत्रिकेवर आक्षेप घेण्यात आले आहेत ती मते मतपेटीत पडली आहेत. त्या मतांना आता ओळखता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे मतमोजणी व्हायला हवी, अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया -मी ना कुणाशी बोललो ना कुणाला बघितले, मी थेट मतदानाला गेलो. मी कायदेशीररित्या माझे मतपत्र माझ्या एजंटला दाखवले आणि मतदान केले. घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने मला कळले की कोणीतरी आक्षेप घेतला; ते त्वरित का केले गेले नाही, असा प्रश्न मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
अजित पवारांनी दौरे केले रद्द - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या पुण्यातील सर्व दौरे रद्द केले आहे. ते पिंपरी चिंचवडमधील विविध विकासकामांचे उद्घटान करत होते.