मुंबई -मुंबईसह राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रविवारी संध्याकाळी यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद पडलेली राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासंदर्भात सोमवारी सर्व कुलगुरूंची बैठक घेतली जाईल. या बैठकित महाविद्यालयांचे वर्ग कशा पद्धतीने भरवावेत, कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी, गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा करून निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असेही सामंत म्हणाले.
राज्यातील २० कुलगुरुंनी घेतला पुढाकार-
शालेय शिक्षण विभागाने २७ जानेवारीपासून राज्यातील ५ वी ते ८ वी इयत्तेचे वर्ग सुरु केले आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांतील वर्ग प्रत्यक्ष भरवले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील २० कुलगुरुंनी पुढाकार घेतला असता त्यांची राज्यपालांसोबत शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.