मुंबई- सालाबादप्रमाणे शिवसेनाचा दसरा मेळावा यंदाही पार पडणार आहे. मात्र त्यावर कोरोना नियमांवलीचे निर्बंध असल्याने विजयादशमीला होणारा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता बंदिस्त सभागृहात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल खासदार संजय राऊत यांनी याविषयीची माहिती दिली. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर तिकडे भगवान बाबा जन्मस्थळ सावरगाव घाट, बीडमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे आपल्या दसरा मेळाव्यात काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी'...वाचा काय म्हणाले संजय राऊत फडणवीसांना ?
शिवतीर्थावर नाही, तर सभागृहात...
राऊत म्हणाले, की शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर न होता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदिस्त सभागृहात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि शिसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार दसरा मेळावा हा षण्मुखानंद सभागृहात करण्याचे ठरले आहे. शुक्रवारी (आज) सायंकाळी हा मेळावा पार पडणार आहे. दसरा मेळावा हा शक्यतो कधी चुकवला जात नाही, महाराष्ट्राला, देशाला त्याची प्रतीक्षा असते.
'विरोधकांच्या नाटक कंपनीला उत्तर देणार'
आमची मुलुख मैदान तोफ असते उद्या ती तोफ धडाडणार. काही लोकांनी दोन वर्षात त्यांना काही काम धंदा उरला नाही. त्यामुळे ही एक नाटक चळवळ सुरू केलेली आहे, तर त्या नाट्य चळवळीलासुद्धा चांगले उत्तर दिले जाईल. संपूर्ण नियम कायदा कोरोना संदर्भात केले आहेत, याचे भान ठेवून हा मेळावा होईल. कोणीतरी टीका करत असेल तरी त्या टीकेला काही अर्थ नाही, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे. तसेच या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या देशाच्या राजकारणाविषयी, महाराष्ट्राचा राजकारणाविषयी विकासाविषयी अशा अनेक प्रश्नावर भाष्य करतील याची खात्री बाळगा, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -ओबीसी अध्यादेश आधी काढला असता तर फायदा झाला असता - पंकजा मुंडे
'२०२४ला डिझेलचा राक्षस जाळणार'
डिझेलचा राक्षस तो आता 2024ला जाळायचा आहे, त्याची सुरुवात उद्याच्या रावण दहनापासून करणार आहोत. चंद्रकांत पाटीस बोलतात. त्यांना बोलत राहू द्या, त्याने महाराष्ट्राला काही फरक पडतो, असे वाटत नाही. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, सरकार काम करते, कायदा काम करतोय सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्ष तोंडाच्या वाफा दवडत आहेत. त्यांना दवडू द्या, मात्र आरोप करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना कोणी किंमत देत नसल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.