महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cyclone Nisarga live Update | किनारी भागावरचा धोका टळला; पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा.. - nisarga cyclone in mumbai

NisargaCyclone
निसर्ग चक्रीवादळ

By

Published : Jun 3, 2020, 6:28 AM IST

Updated : Jun 3, 2020, 10:05 PM IST

21:55 June 03

किनारी भागावरचा धोका टळला; पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा..

मुंबई - निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ओसरली असून, किनारी भागातला धोका टळला आहे. येत्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासोबतच रायगड, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा याठिकाणी येत्या दोन ते अडीच तासांमध्ये जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

21:26 June 03

रत्नागिरी-श्रीवर्धनमधील वीजपुरवठा पूर्ववत..

मुंबई - रत्नागिरी आणि श्रीवर्धन शहरांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तर मुरूड, मांडगाव, गोरेगाव, अलीबाग, म्हासाळा, गुहागर आणि दापोली तालुक्यांमधील वीजपुरवठाही लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या भागांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

21:21 June 03

चक्रीवादळात मदत व बचावकार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार..

मुंबई : 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

"महाराष्ट्रावर करोनाचे संकट घोंघावत असतानाच चक्री वादळाचा तडाखा बसला. संकट म्हटले तर मोठे होते, मात्र हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने यावेळी अपघातात दोन जीव गेले. कोकणात तसेच इतरत्र नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबई वर आहे, तसे पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच." अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

21:15 June 03

पुणे विमानतळावरील सहा विमानांचे मार्ग बदलले, एक रद्द..

पुणे -निसर्ग चक्रीवादळामुळे बदललेल्या हवामानाचा फटका हवाई सेवेलाही बसला आहे. पुणे विमानतळावरील सहा विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, एक विमान रद्द करण्यात आले असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

21:05 June 03

नवी मुंबईतील चाळीवर कोसळले घर; सुदैवाने जीवीतहानी नाही..

नवी मुंबईतील चाळीवर कोसळले घर; सुदैवाने जीवीतहानी नाही..

नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे नवी मुंबईत पाऊस बरसत असून, जोरदार सोसाट्याचा वारा सुटला आहे. यामुळे अनेक भव्य झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. जोरदार पावसामुळे नवी मुंबईतील नेरुळ परिसरात 10 बैठ्या चाळीतल्या घरावर वडाचे झाड कोसळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

20:29 June 03

चक्रीवादळात घर पडून वृद्ध महिलेचा मृत्यु; कुटुंबातील पाचजण गंभीर जखमी..

पुणे - निसर्ग वादळाच्या तडाख्यामुळे खेड तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असुन, वहाओगाव येथील दोन घरांवरील छत घरातील नागरिकांच्या अंगावर पडुन एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यु झाला आहे. या दुर्घटनेत पाचजण जण जखमी झाले असुन, त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंजाबाई अनंता नवले (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे.

19:11 June 03

चक्रीवादळात विद्युत खांब अंगावर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू

  • विद्युत खांबा अंगावर पडून एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
  • जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली माहिती


 

17:46 June 03

चक्रीवादळाचा तडाखा पुण्यातही.. झाडं पडली उन्मळून

पुण्यात वादळाने झाड उन्मळून पडली

17:31 June 03

मुंबईचा धोका टळला... वादळानं बदलली दिशा

वादळानं बदलली दिशा

17:27 June 03

मुंबईत वादळाने काही इमारतीवरील छते उडाली

मुंबईत वाधळाचे रौद्र रूप

17:13 June 03

अलिबागमध्ये झाडे उन्मळून पडली.. एनडीआरफचे मदतकार्य सुरू

अलिबागमध्ये झाडे उन्मळून पडली..

वादळानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) उन्मळून पडलेली झाले रस्त्याच्या कडेला हलवली.

16:52 June 03

मुंबईच्या प्रवेशद्वारावरील झोपड्यांना वादळाचा फटका बसण्याची शक्यता

मुंबई-मुंबईतीलमानखुर्द परिसरामध्ये निसर्ग चक्रीवादळाची चाहूल लागली असून या परिसरात काही वेळापासून पावसाला सुरुवात झाली आहे. वारेही वेगाने वाहत असून परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका या परिसराला बसण्याची शक्यता आहे.

16:40 June 03

मुंबई समुद्र किनाऱ्यालगतच्या 10,840 नागरिकांची सुरक्षित स्थळी रवानगी

मुंबई समुद्र किनाऱ्यालगतच्या 10,840 नागरिकांची सुरक्षित स्थळी रवानगी

मुंबई महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 35 ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय पालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली आहे. या निवाऱ्यांमध्ये समुद्र किनारी भागात राहणाऱ्या 10,840 नागरिकांना हलवण्यात आले आहे.

16:10 June 03

धोका वाढला! मुंबईजवळ पोहोचलं निसर्ग चक्रीवादळ

अलिबागपासून वादळ पुढे सरकले आहे. सध्या वादळ मुंबईपासून पासून काही किलोमीटरवर आहे. त्यामुळे मुंबईचा धोका वाढला आहे.

16:06 June 03

माहीम समुद्रकिनाऱ्याला भरती

माहीम समुद्रकिनाऱ्याला भरती

15:38 June 03

मुंबईतील नरिमन पाॅईंट भागात पावसाला सुरुवात

मुंबईतील नरिमन पाॅईंट भागात पावसाला सुरुवात

15:19 June 03

संध्याकाळी 7 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेक ऑफ किंवा लँडिंग होणार नाही

निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संध्याकाळी 7 पर्यंत टेक ऑफ किंवा लँडिंग होणार नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

15:09 June 03

निसर्ग चक्रीवादळाचे रत्नागिरीत रौद्र रूप... घरावरचे छत उडाले

निसर्ग चक्रीवादळाचे रत्नागिरीत रौद्र रूप..

14:56 June 03

रायगडमध्ये एका इमारतीचे छत उडाले

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगडमधील समुद्रकिनारी भागाला बसला आहे. या वादळात एका इमारतीवरील छत उडाले आहे.


 

14:47 June 03

पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पश्चिम किनारपट्टीच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेतली आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल व प्रभाग अधिकाऱ्यांशी बोलून वादळामुळे कमीतकमी नुकसान होईल हे पाहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातून उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावे व सावधानता बाळगावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

14:09 June 03

अलिबाग किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ धडकले, मुसळधार पावसाला सुरुवात

अलिबागमध्ये मुरुड किनाऱ्याला धडकले निसर्ग चक्रीवादळ

अलिबागच्या किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळाने धडक दिली आहे. तसेच या ठिकाणासह संपूर्ण कोकण किनारपट्टी वादळी वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उम्नळून पडले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर ही झाड पडल्यामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने आता महामार्गावरील वाहतूक बंदच ठेवली आहे. 

13:58 June 03

रत्नागिरीत 'निसर्ग'चा कहर, समुद्रात उंच लाटांचे तांडव सुरू

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकले आहे. वाऱ्याच्या वेगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रत्नागिरी किनारपट्टीवर समुद्र खवळला असून उंच लाट किनाऱ्यावर येऊन धडकत आहेत. 

13:48 June 03

मुंबईतील वाऱ्याची गती वाढली

निसर्ग चक्रीवादळ
  • एनडीएरएफच्या एकूण ४१ टिम गुजरात आणि महाराष्ट्रात तैनात, राज्यात २१ टिम तैनात
  • एनडीआरएफने तब्बल १ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
  • राज्याच्या समुद्र किनार पट्टीवर मुसळधार पावसाला सुरुवात, मुंबईत वाऱ्याचा ताशी वेग ७१ किमी पेक्षा जास्त
  • मुंबईतील वाऱ्याची गती वाढली
  • ताशी 39 किलोमीटर वाऱ्याचा वेग
  • उरणकडे सरकताना वाऱ्याच्या गतीत वाढ

13:20 June 03

निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ मुरुड किनाऱ्याला धडकले

निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनाऱ्याला धडकले

निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ मुरुडच्या किनाऱ्याला धडकले आहे. पुढचे तीन तास मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसाठी कसोटीचे. सायंकाळी वादळी पाऊस सह्याद्री माथा ओलांडून उत्तर महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.

12:51 June 03

रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रात भरकटलेले जहाज किनाऱ्याला लागले.. १३ खलाशी सुरक्षित

रत्नागिरी, भरकटलेले जहाज किनाऱ्याला लागले

निसर्ग चक्रीवादळाचा काहीसा परिणाम रत्नागिरी किनारपट्टीवर झाला. दरम्यान वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात एक जहाज सापडले होते. आज सकाळी हे मालवाहू जहाज भगवती समुद्र किनाऱ्यापासून लाटांच्या तडाख्यामुळे भरकटले होते. त्यानंतर हे जहाज मिऱ्या येथील पांढरा समुद्राजवळच्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. या जहाजावर 13 खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.

12:49 June 03

निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या किनारपट्टीवर थोड्याच वेळात धडकणार, वाऱ्याचा वेग वाढला

12:35 June 03

'निसर्ग'ने केली पोलखोल; पहिल्याच पावसात मुंबईतील नाले तुंबले

मुंबई पहिल्या पावसात नाले तुंबले

मुंबईत पहिल्याच पावसात घाटकोपर सज्जनगड परिसरात नोल तुंबून पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे.  निसर्ग चक्रीवादळामुळे सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर मात्र, नाले सफाई केली हा दावा पालिकेचा खोटा ठरला आहे. नाल्यातील पाण्यामुळे काही वाहने वाहून गेल्याचा व्हिडिओ ट्विटकरत राम कदम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'आता ही परिस्थिती पाहिल्यावर संजय राऊत यांनी म्हणून नये राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री तुम्ही स्वतः ही परिस्थिती बघा' असे ट्विट आमदार राम कदम यांनी केले आहे.

12:21 June 03

मुंबई- निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या भायखळा येथील वीर जीजामाता प्राणीसंग्रहालयातील म्हणजेच राणीबागेतील वाघ, बिबट्या आणि तरस या प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवले.

राणीच्या बागेतील झाडे कोसळल्यास किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बचाब कार्यासाठी 20 जणांची टीम तैनात करण्यात आली आहे..

12:15 June 03

निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने, सिंधुदुर्गात परिस्थिती सामान्य

सिंधुदुर्गमध्ये निसर्गमुळे समुद्र खवळला

सिंधुदुर्ग- निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती सामान्य आहे. किनारी भागात जोरदार वारे वाहत असल्याने समुद्र खवळलेला आहे. तर जिल्ह्यात गेले 3 दिवस जोरदार पाऊस पडत आहे.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मालवण तारकर्ली येथे NDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे

12:15 June 03

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५४१ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत कऱण्यात आले आहे. अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निवारागृह उभारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळ हरीहरीश्वेर आणि दमण च्या मध्यातून अलिबागकच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

11:47 June 03

रायगड- निसर्ग चक्रीवादळ दिवेआगर जवळ पोहोचले असून अलिबागकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर रेवदंडा पूल वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला आहे. सध्य स्थितीत श्रीवर्धनमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

11:44 June 03

  • मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली वरळी हाजीअली आणि महालक्ष्मी येथे पाहणी
  • मुंबई सी लिंक आता प्रवासासाठी बॅरिकेट्स लावून केला बंद

11:42 June 03

मुंबईमधील समुद्र किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या महापालिकेच्या सूचना

मुंबई - शहरातील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या महापालिकेने सूचना केल्या आहेत. ए वॉर्डमधील ससून डॉक बधवार पार्क इतर कोळीवाडे, जी साऊथ वरळी कोळीवाडा आणि समुद्र किनाऱ्याचा भाग, जी नॉर्थ दादर माहीम माटुंगा येथील समुद्र किनाऱ्याचा भाग, सांताक्रूझ जुहू वर्सोवा चौपाटी जवळच्या एच वेस्ट व के वेस्ट विभागातील भाग तसेच पी नॉर्थ, आर सेंट्रल, आर साऊथ येथील समुद्र किनाऱ्या बाजूचा भागातील नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवण्याचे आदेश..

मुंबईत गिरगाव, दादर, जुहू वर्सोवा, अकसा आणि गोराई या सहा महत्वाच्या चौपाट्या आहेत त्या बाजूला नागरिकांची आणि मच्छीमारांचीही वस्ती आहे.. या विभागातून नागरिकांना हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच माहीम मधील 1000 ते 1500 लोकांना माहीमच्या शाळेत स्थलांतर करत असल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली.

11:25 June 03

निसर्ग वादळाचा मुंबईच्या दिशेने वेगाने प्रवास

मुंबई- निसर्ग वादळाचा मुंबईच्या दिशेने वेगाने प्रवास, अरबी समुद्रात घोंगावणारे हे वादळ मुंबईपासून दक्षिणेस 150 किमी अंतरावर आहे. 

कोकण किनारपट्टीवर सध्या वाऱ्याचा वेग ताशी ८५ किमी वेगाने वाहत आहे. काही दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडकेल त्यावेळी  वाऱ्याचा वेग १०० -११० ते १२० किमी इतका राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

10:54 June 03

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा -उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातंच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावे. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 

10:51 June 03

आज दुपारी १ ते ३ वाजताच्या सुमारास अलिबागमध्ये धडकणार 'निसर्ग' चक्रीवादळ

रायगडमध्ये धडकणार चक्रीवादळ

रायगड निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रात अलिबाग पासून 115 तर मुंबईपासून 165 किलोमीटर लांब आहे. किनारपट्टीवर हवेचा वेग ताशी १०० ते ११० किमी राहिल. आज दुपारी १ ते ३ वाजताच्या सुमारास अलिबागच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. या वादळामुळे रायगड किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे.  मागील 24 तासात जिल्ह्यात 17 मिमीच्या सरासरीने पाऊस पडला. माथेरान (34), पेण (,38) कर्जत(29), अलिबाग(,27) या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

10:43 June 03

आज दुपारी मुंबईत धडकणार 'निसर्ग'

निसर्ग दुपारी मुंबईत धडकणार

मुंबई- निसर्ग चक्रीवादळ आज रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकण किनार पट्टीवर एनडीआरएफच्या पथकाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबईतही अग्निशामक दल, मुंबई पोलीस एनडी आरएफकडून किनारपट्टी भागात बचाव पथके तैनात करण्यात आली आहे. निसर्गचक्रीवादळ आज दुपारी मुंबईत धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे, ईटीव्ही भारतच्या रिपोर्टर जया ज्योती पेडणेकर यांनी..

10:19 June 03

निसर्ग चक्रीवादळ दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास मुंबईत धडकणार

मुंबईतून निसर्ग चक्रीवादळाची अपडेट

येत्या काही तासात निसर्ग चक्रीवाद मुंबईमध्ये धडकणार आहे. या वादळामुळे मुंबईत पालिका, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, नेव्ही आदी विभाग समुद्र किनारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत समुद्र किनारी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळ सकाळी 10 च्या दरम्यान मुंबईत येईल अशी शक्यता होती. मात्र या वादळाची गती कमी झाल्याने हे वादळ आता दुपारी 2 ते 3 दरम्यान मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समुद्राला सकाळी 10 वाजता भरती आहे. यावेळेत हे वादळ आले असते तर मुंबईला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असता. आता वादळ दुपारी येणार असल्याने मुंबईला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

10:10 June 03

निसर्गचा फटका; मुंबईतून आज सुटणाऱ्या विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल

मुंबई-निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतून आज सुटणाऱ्या विशेष लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तर मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून या गाड्या नियोजित वेळेपेक्षा मुंबईत उशिराने दाखल होतील.

असा असेल बदल-

02542 एलटीटी - गोरखपूर स्पेशल ट्रेन 8 वाजता ऐवजी 11वाजून10 मिनिटांनी सुटेल.

06345 एलटीटी - तिरुवंथपूरम विशेष गाडी 6 वाजता ऐवजी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल.

01061एलटीटी दरबंगा विशेष गाडी 8. 30 वाजता ऐवजी 12 वाजून 15 मिनिटांनी सुटेल.

01071 एलटीटी वाराणसी विशेष गाडी 9 वाजता ऐवजी 12 वाजून 40 मिनिटांनी सुटेल.

01019 सीएसएमटी भुवनेश्वर विशेष गाडी 8 वाजता ऐवजी 3 वाजून 05 मिनिटांनी सुटेल.

खालील मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल, तसेच गाड्या त्यांच्या वेळेनुसार उशिराने मुंबईत दाखल होतील

03201 पटना एलटीटी विशेष गाडी 11 वाजून 30 मिनिटांनी येणारी गाडी

01094 वाराणसी सीएसएमटी विशेष गाडी 2 वाजून 15 मिनिटांनी येणारी गाडी

06436 तिरुवंथपूरम एलटीटी विशेष गाडी 5 वाजून 40 मिनिटांनी येणारी गाडी

10:01 June 03

रत्नागिरी- निसर्गाशी झुंज! मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये भरकटलेले जहाज

जहाज अडकले

निसर्ग चक्री वादळाचा कहर आता किनार पट्टी दिसायला सुरू झाला आहे. या तुफानामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या मिऱ्या किनारपट्टी भागात एक जहाज भरकटले आहे. जहाजावर काही खलाशी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या वादळामुळे जिल्ह्यात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

09:31 June 03

किनारपट्टी भागात वाऱ्याच्या वाढत्या वेगासह मुसळधार पावसाचा अंदाज

निसर्ग

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वाऱ्याच्या वेगात वाढ,  ताशी ५५ ते ७५ किमी वेगाने वारे वाहू लागले. कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकेल त्यावेळी ताशी ११० ते १२० किमी वाऱ्याचा वेग राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरीत पावसाच्या सरी मंदावल्या असल्या तरी वाऱ्याचा वेग वाढला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

अरबी समुद्रात घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टी भागाकडे वेगाने मार्गक्रमण करत आहे, हे वादळ अलिबाग पासून दक्षिणेकडे १५५ किमी अतंरावर तर मुंबईपासून १७५ किमी अंतरावर पोहोचले आहे. पुढील २ तासात वाऱ्याच्या वेगात वाढ होऊन मुंबईसह कोकण किनारपट्टी मुसळधार पावसाला सुरुवात होईल.

09:20 June 03

घरातच थांबा, मुंबई पोलिसांकडून कलम १४४ लागू

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४  लागू केले आहे. तसेच आपत्ती काळात जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर कारमध्ये हातोडा किंवा काच फोडता येईल, कारण कोणत्याही कारणामुळे तुमचा दरवाजा लॉक झाला तर उपाययोजना असावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. 

08:44 June 03

दुपारी चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता, मुंबईतून विमानसेवा खंडित, नागरिकांचे स्थलांतर

नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तर आता पर्यंत रायगड जिल्ह्यात तब्बल ११ हजार २६० लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ४५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दमनमधूनही एनडीआरएफचे जवान नागरिकांन सुरक्षित स्थळी हलवत आहेत. सध्या वाऱ्याच्या वेगात वाढ झाली असून ८५ ते ९०  वरून ताशी ११० किमी वेगाने वारे वाहू लागले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी पाऊस पडला. कुलाबा, दादर, पवई, कांदिवली, मीरा भाईंदर या ठिकाणी १० ते २० मिमी पाऊस झाला. ठाणे, नवी मुंबई, जुहू, वरळी, बोरीवली, मुलुंड भांडुप, चेंबुर या ठिकाणी ५ ते १० मिमि पावसाची नोंद झाली. नवी मुंबईत काही ठिकाणी १० ते २० मिमी पाऊस झाला.

08:06 June 03

किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज, वाऱ्याच्या वेगात वाढ -आयएमडी

आज सकाळ पर्यंत किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात गोव्यात ७४ मिमी. रत्नागिरीत -२० मिमी, कुलाबा ३७ मिमी. सांताक्रुझ २१ तर डहाणू मध्ये ४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या काही तासात किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादाळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग गोव्यात ताशी ३३, रत्नागिरीत -३३ कुलाबा ३३, सांताक्रुझमध्ये ९ तर डहाणूमध्ये ताशी ७ किमी वेग असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

07:49 June 03

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, भाटे समुद्र किनारी लाटांचे रौद्ररुप

रत्नागिरी समुद्रकिनारा

07:39 June 03

रायगड समुद्र किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला, समुद्राच्या लाटाही उसळायला सुरुवात

निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीभागाकडे मार्गक्रमण करत आहे. या काळात वाऱ्याचा वेग रत्नागिरी जिल्ह्यात ताशी १०० किमी पर्यंत राहिल. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात ताशी १२० किमी वेगाने वारे किनारपट्टीवर येऊन धडकेल. पुढे दक्षिण गुजरातच्या किनार पट्टीवरदेखील वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ११० किमी इतका राहिल.

निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवरील अलिबागपासून १५५ किमी, तर मुंबईच्या दक्षिणेस २०० किमी अंतरावर पोहोचले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे, वाऱ्याचा वेग वाढत असून किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा उसळायला सुरुवात झाली आहे. 

06:26 June 03

'निसर्ग'चा वेग वाढला, राज्यात एनडीआरएफच्या २० तुकड्या तैनात

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून दक्षिणेकडे साधारणात २०० किमी अंतरावर असून वाऱ्याच्या वेगात वाढ होत आहे. निसर्ग वादळाचा वेग ताशी पहाटे २.३० च्या सुमारास १०० किमी प्रतितास इतका होता. पुढील १२ तासात वादळाचा वेग ताशी १२० किमी इतका राहिल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशानस पूर्णपणे सज्ज आहे. 

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या २० तुकड्या किनारी भागातील जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईमध्ये ८ रायगडमध्ये ५, पालघर जिल्ह्यात २, ठाणे -२, आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गामध्ये प्रत्येकी १ तुकडी तैनात करण्यात आली असल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे.

03:52 June 03

राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची 'हजेरी'

मुंबई- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडत आहे. सध्या हे चक्रीवादळ मुंबईकडे मोठ्या वेगाने सरकत आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पुढील ६ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासह मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या परिसरातही जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील सांताक्रूज, कुलाबा आणि गोव्यातही जोरदार पाऊस पडत आहे. 

Last Updated : Jun 3, 2020, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details