मुंबई -चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) होणार आहे. मात्र या विमानतळासाठी श्रेय वादाची लढाई अद्यापही संपलेली नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी पाहुणे म्हणून विमानतळाच्या उद्घाटनाला यावं. आम्ही त्यांचा पाहुणचार करू, असं म्हणत विमानतळासाठी आपण केलेल्या सर्वतोपरी प्रयत्नांमुळेच सिंधुदुर्गात विमानतळ झाले असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांसोबत वैयक्तिक वैर नाही, त्यांना कोकणचे मासे खायला घालू -
नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपले कोणतेही वैयक्तिक वैर नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात यावे व विमानतळाचे उद्घाटन करावे. आम्ही त्यांचे स्वागत करू, हवं तर त्यांना कोकणातले मासे खायला घालू, असं मिश्किलपणे नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे राणे म्हणाले उद्घाटना कार्यक्रमामध्ये आपल्याला भाषणासाठी पाच मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र या पाच मिनिटाच्या भाषणात देखील आपण आपल्या शैलीप्रमाणे भाषण करु. कोणत्या नेत्यांनी केवळ श्रेयवाद केला याचा खुलासा आपल्या भाषणात करणार असल्याचेही राणे म्हणाले.
हे ही वाचा -चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई
कोकणाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प आणले -
आपण पहिल्यांदा आमदार झालो होतो, त्यावेळेस सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरिद्री जिल्हा म्हणून हिणवले जात होते. मात्र त्यानंतर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प या जिल्ह्यात आणले. सिंधुदुर्गातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. कोकणातील होणाऱ्या महामार्गासाठी प्रयत्न केल्यानेच आज कोकणामध्ये महामार्ग दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून ओळख व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली. त्यांनी सांगितले की, १९९० मध्ये मालवण - कणकवली मतदारसंघाचा आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याचा अहवाल तयार करण्याचे काम 'टाटा ' कंपनीमार्फत केले गेले. या कंपनीने दिलेल्या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटन क्षेत्राला चालना दिल्याखेरीज होणार नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. 1999 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एकाच वेळी 110 कोटींचा निधी जिल्ह्यात आणून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना जोडणारे सर्व रस्ते व ब्रीज एकाच वेळी केल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा -चिपी विमानतळ राज्याचा प्रकल्प, राणेंनी त्यात लुडबूड करू नये - उपरकर
कार्यक्रम पत्रिकेवरून मुख्यमंत्र्यांचा संकुचितपणा दिसला -
चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेत पहिलं नाव मुख्यमंत्र्यांचे मोठ्या अक्षरात आहे. त्यानंतर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव, तर तिसर्या क्रमांकावर आपलं नाव छापलं आहे. आपलं नाव अगदी छोट्या अक्षरात लिहिण्यात आले याबाबत नारायण राणे यांनी खंत व्यक्त केली. विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न करून आघाडी सरकारने आपली संकुचित वृत्तीच दाखविली आहे, असेही ते म्हणाले.