मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध लस बाजारात येत आहेत. काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील लसींची मानवी चाचणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड व पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या 'कोविशिल्ड' लसीचा रुग्णांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास पालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू होणार आहे. यानुसार १३ जणांची स्क्रिनिंग पूर्ण झाली असून त्यापैकी तिघांना लस टोचण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लस शोधण्याचे काम सुरू आहे. इग्लंडच्या ऑक्सफर्ड व पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या 'कोविशिल्ड' लसीचा रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याने चाचणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्रुटी दूर झाल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर मुंबईत महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात या लसीचा रुग्णांवरील परिणाम अभ्यासण्यात येणार आहे.
केईएम रुग्णालयात करण्यात येणाऱ्या चाचण्यांना एथिक समितीची मंजुरी मिळाल्यानंतर १० स्वयंसेवकांच्या पीसीआर आणि अँटिबॉडी टेस्ट टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर लस दिली जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. लस टोचल्यानंतर या स्वयंसेवकांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर काही दुष्परिणाम होतो का, हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर एक महिन्यांनी पुन्हा लस दिली जाणार आहे. १३ पैकी ३ स्वयंसेवकांना आज लस दिली जात असून आज आणखी १० स्वयंसेवकांना स्क्रिनिंगसाठी बोलवण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.