मुंबई -आज(8 ऑक्टोबर) आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि सरकारी वकील यांच्यात जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. यामुळे आता आर्यनचे वकील जामिनासाठी सत्र न्यायालय म्हणजेच सेशन कोर्टात दाद मागणार आहेत.
कालच आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामुळे आज त्याला जामीन मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आज आर्यनला जामीन मिळाला नसल्याने त्याला सत्र न्यायालयातून किंवा उच्च न्यायालयातून जामीन मिळवावा लागणार आहे. तोपर्यंत त्याला आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागणार आहे. आज आर्यनची आई गौरी खान हिचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी मुलगा घरी येईल अशी अपेक्षा गौरी खानला होती. मात्र, आर्यनला जामीन न मिळाल्याने आजच्या दिवशी आई आणि मुलाची भेट होऊ शकलेली नाही.
आर्यन खानसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस्प्लनेड यांच्या कोर्टात दुपारी सुनावणी सुरु झाली. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट तसेच मुनमुन यांना जामीन दिल्यास पुरावे मिटवले जाण्याची शक्यता असल्याने त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला. यावर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी, कमी प्रमाणात ड्रग्स पकडले तरी त्या लोकांशी कशा प्रकारचा व्यवहार केला जातो याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखला दिला. तसेच उच्च न्यायालये अशा आरोपींना जामीन मंजूर करण्यात उदार आहेत. परंतु तक्ररदार अजूनही जामिनाला विरोध करत आहेत. आर्यनकडे काहीही मिळाले नाही तरीही त्याचे भांडवल केले जात आहे. जर न्यायालयाने जामीन अर्जांच्या स्थिरतेवर निर्णय घेण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय घ्यावा. आपण तांत्रिकतेवर उभे राहू नये, गुणवत्तेवर जाऊया. कारण गुणवत्तेशिवाय तांत्रिकतेचा उपयोग नाही. आर्यन खान २३ वर्षाचा आहे. तो बॉलिवूडमधील असल्याने तो तिथे गेला. त्याच्याकडे काही ड्रग्स आहेत का असे विचारले असता त्याने आपल्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले आहे. आर्यन एका श्रीमंत कुटुंबातील सदस्य आहे. याचा अर्थ असा नाही की तो पुराव्यांशी छेडछाड करेल. त्याने आतापर्यंत तपास यंत्रणेवर कोणताही प्रभाव पाडलेला नाही. गेल्या सहा दिवसांपासून तो एनसीबीला सहकार्य करत आहे. यामुळे आर्यनला जामीन द्यावा, अशी मागणी मानेशिंदे यांनी केली.
वाचा, आज दिवसभरात कोर्टात काय घडलं?
- न्यायालयाने जामीन अर्ज नाकारला
न्यायाधीश आर. एम. निर्लेकर यांनी आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा जामीन अर्ज नाकारला आहे.
- आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
आर्यन खानचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे त्याचे वकील आता सेशन कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
- आर्यन श्रीमंत कुटुंबातील सदस्य, याचा अर्थ असा नाही की तो पुराव्यांशी छेडछाड करेल - मानेशिंदे
आर्यन एका श्रीमंत कुटुंबातील सदस्य आहे. याचा अर्थ असा नाही की आर्यन पुराव्यांशी छेडछाड करेल, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला. गेल्या सहा दिवसांपासून एनसीबीला सहकार्य करत आहे.
- अनिल सिंहांनी वाचला रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज
अनिल सिंह यांचा युक्तीवाद सुरू आहे. यावेळी त्यांनी रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज वाचला. हे प्रकरण कसे जामीनासाठी योग्य नसल्याचे सिंह यांनी कोर्टाला सांगितले.
- आर्थर रोड कारागृहातील विलगीकरण कक्षात राहणार आर्यन
आर्यन खानला आर्थर रोड कारागृहातील विलगीकरण कक्षात ३-४ दिवस ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे.
- आर्यन खानच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण -
आर्यन खानच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. आता उर्वरित आरोपी अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेलाचा जामीन अर्जावर लंचनंतर युक्तिवाद सुरू झालेला आहे. अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेलाचा जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायाधीश आपला निकाल देणार आहेत.
- आर्यनला आर्थर रोड कारागृहातील विलगीकरण कक्षात ठेवणार
आर्यन खान आणि इतर आरोपींना आर्थर रोड जेलच्या विलिगिकरण सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृह परिसरात कारागृह प्रशासनाने विलिगिकरण सेल तयार केला आहे. आरोपींना तेथे 3-5 दिवस ठेवण्यात येईल. सर्व आरोपींचा आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आहे. परंतु नवीन जेल मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवीन आरोपींना क्वारंटाईन सेलमध्ये 3 ते 5 दिवसांसाठी ठेवले पाहिजे असा नवीन नियम आहे.
- आफ्रिकन ड्रग पेडलरला ११ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी
आरोपी नंबर अकरा आफ्रिकन वंशाचा नागरिक असलेला ड्रग पेडलरला कोर्टाने ११ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी दिली आहे.
- चौकशीला सहकार्य करू, आर्यनला जामीन द्या - सतीश मानेशिंदे
एनसीबीच्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू, त्यामुळे आर्यन खानला जामीन देण्याची मागणी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात केली आहे.
- 18 व्या आरोपीला रिमांडसाठी कोर्टात आणले
एनसीबीने या प्रकरणातील 18 व्या आरोपीला अटक केली आहे. त्याला रिमांडसाठी कोर्टात आणण्यात आले आहे. चिनेडू इग्वे असे त्या आरोपीचे नाव आहे.
- आर्यनविरोधात कोणतेही पुरावे नाहीत - मानेशिंदे
आर्यन २३ वर्षांचा आहे, त्याच्याविरोधात पूर्वी कोणतेही पुरावे आढळले नाहीत, फोन चॅटमध्येही कोणतेही पुरावे नाहीत, असे मानेशिंदे यांनी जामिनावर युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले.
- कोर्टात वकिलांमध्ये खडाजंगी -
सुनावणीवेळी NCB कडून वकील अनिल सिंह हे बाजू मांडत आहेत. तर आर्यन खानकडून सतीश मानेशिंदे युक्तीवाद करत आहेत. यावेळी दोन्ही वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. मानेशिंदे हे आर्यनच्या जामिनासाठी आग्रही होते, तर अनिल सिंह हे NCB ची बाजू कशी योग्य आहे हे सांगत होते.
आर्यनला आर्थर रोड कारागृहात आणले -
आर्यन खानला आर्थर रोड कारागृहात
- आर्यन खानला आर्थर रोड कारागृहात नेताना
- सविस्तर बातमी -
मुंबई -क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यनसह आठ जणांना काल (7 ऑक्टोबर) किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचासह आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, यावर किला न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. सर्व पक्षांचे वकील न्यायालयात हजर झाले असून एनसीबीचे अधिकारीही न्यायालयात आले आहेत. आर्यनला जेल मिळेल की बेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आर्यन खानला जेजे रुग्णालयात नेताना एनसीबीचे अधिकारी
युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे -
- आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान आर्यनचे वकील सतिश मानेशिंदे म्हणाले, की भारत सरकार या प्रकरणाबद्दल इतके नाराज का आहे? असे कसे काय म्हणू शकता. त्यावर एनसीबीचे वकील अनिल सिंह म्हणाले, तुम्ही अस म्हणू शकत नाही.
- आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे जामीन अर्जावर अनेक कोर्टाचा निर्णयाचे पुरावे देत आहेत. मात्र, त्यांच्या युक्तीवादावर एनसीबीचे वकील आपक्षेप घेत आहेत.
- आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला जामीन दिल्यास, पुरावेत मिटण्याची शक्यता आहे, असे एनसीबीचे वकील म्हणाले.
- यामुळे या सर्व आरोपीना न्यायालयीन कस्टडीत ठेवणे गरजेचे आहे -अनिल सिंह
- क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स वितरकापर्यत या प्रकरणाचे धागेदोरे पोहचू शकते -अनिल सिंह
- कोणतेही षडयंत्र उघड करण्यासाठी कोणतेही साहित्य आर्यन खानकडे सापडले नाहीत -मानेशिंदे
- आर्यनचा बॅगमध्ये कोणतेही साहित्य सापडले असेल एनसीबीने दाखवावेत -मानेशिंदे
- एनसीबीला खटला चालवायचा असेल आर्यन खांकडे सापडलेले पुरावेत साहित्य कोठे आहे? -मानेशिंदे
- माझ्या विद्वान मित्राच्या म्हणण्यानुसार गुन्हा जामीनपात्र आणि अजामीनपात्र आहे हे व्यवस्थित ठरलेले आहे -मानेशिंदे
- काय आहे प्रकरण? -
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या 'कॉर्डिया द क्रूझ'वर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले होते. यामधील आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धामेचा या तीन जणांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पुन्हा आठ जणांना न्यायालयात हजर केले असता ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - कार्डिया क्रुझ प्रकरणात एनसीबीने सोडलेले 'ते' दोघे भाजपा नेत्याचे नातेवाईक; नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप