मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने 24 जानेवारी रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला होता.शीना बोरा जम्मू-काश्मीरमध्ये जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता. या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आज निर्देश सीबीआयला दिले होते मात्र सीबीआयने न्यायालयात दोन आठवड्यांचा वेळ मागितल्याने न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांचा वेळ मंजूर केला आहे आता या प्रकरणात पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
गेल्या महिन्यात तिच्या वकिलाने सना खान यांनी सांगितले होते की इंद्राणीने 27 नोव्हेंबर रोजी सीबीआय संचालकांना पत्र लिहिले होते की तिच्या तुरुंगातील एका कैद्याने शीनाला काश्मीरमध्ये जिवंत पाहिले होते श्रीनगरमध्ये सुट्टीवर असताना इंद्राणीची जेलमधील एक महिला कैदिने शिनाला जिवंत पाहिले असल्याचा दावा केला होता. संचालकांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय एजन्सीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी इंद्राणीने केली होती.
पत्रात आणखी काय लिहिलंय?
सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले जिने तिला सांगितलं की ती काश्मीरमध्ये मी शीना बोराला भेटली होती. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्याला अशी मागणी इंद्राणीनं केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे.
इंद्राणी सर्वोच्च न्यायालयात जाणार?
इंद्राणी मुखर्जीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र गेल्याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यामुळे इंद्राणी आता जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते आहे.
फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो?
एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असंही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं होतं.
काय आहे प्रकरण
इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.