मुंबई -राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून ( NDA president candidate Draupadi Murmu ) झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय झाला आहे. त्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. मुर्मू यांच्या विरोधात विरोधीपक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. 18 जुलैला या पदासाठी निवडणूक पार पडली आहे. यात मुर्मू ( Draupadi Murmu win ) यांचा विजय झाला आहे. मुर्मू यांचा विजय झाल्याने त्या देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपाने द्रौपदी मुर्मू यांनाच निवडले. कसा आहे द्रौपदी मुर्मूंचा प्रवास जाणून घ्या...
अध्यक्षपदासाठी भाजपाने यावेळी आदिवासी चेहऱ्यावर डाव खेळला आहे. गेल्या वेळी भाजपाने राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा पुढे केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी होते. 2017 मध्ये, एनडीएकडून उमेदवार बनण्यापूर्वी ते बिहारच्या राज्यपालपदावर होते. अशा स्थितीत दलितांपाठोपाठ आता आदिवासींकडेही भाजपाने मोर्चा वळवला आहे. द्रौपदी मुर्मू संथाल कुटुंबातील आहेत. त्या मूळच्या ओडिशाच्या आहेत. (2000 ते 2004) या काळात त्या ओडिशाच्या आमदारही होत्या.
कोण आहेत द्रौपदी मुर्मू ? :द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. पाच वर्षांची टर्म पूर्ण करणाऱ्या पहिल्या राज्यपाल ठरल्या. झारखंडची स्थापना 2000 साली झाली. त्यानंतर 2015 ते 21 दरम्यान मुर्मू या राज्यपाल होत्या. द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशा राज्याच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात. ओडिशात त्या भाजपा-बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या. 2000 ते 2004 दरम्यान त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. विशेष म्हणजे, द्रौपदी मुर्मू यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र दुखाने भरलेले आहे. मुर्मू यांच्या पतीचे निधन झालेले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.