मुंबई - देशासह महाराष्ट्र सध्या कोरोना विरुद्धच्या लढाईत शड्डु ठोकून उभा आहे. त्याचवेळी राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज प्रतिस्पर्धी मात्र एकमेकांविरोधातच शड्डु ठोकताना दिसत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील हा सामना सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.
काय आहे प्रकरण...
काही दिवसांपुर्वी चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटील यांना खोचक सल्ला दिला होता. जयंतराव कोरोना विरूद्धच्या लढाईत आम्हाला सहभागी होण्याचे आवाहन करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना करा. शिवाय तुमच्या घटकपक्षांनाही त्याची अधिक गरज आहे. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडी सरकारच्या घटक पक्षांचे योगदान काय ? असा प्रश्न उपस्थित केला होता.
जयंत पाटलांनी काय दिले उत्तर?
चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी ट्विट करून जोरदार उत्तर दिले आहे. 'चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते’ असं जयंत पाटील म्हणाले आहेत.