मुंबई - वाधवान कुटुंबीयांना विशेष परवानगीने महाबळेश्वर येथे जाऊ दिल्याबद्दल सध्या राजकीय रणकंद होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना संपादकीयमधून विरोधी पक्षावर तोफ डागण्यात आली आहे. 'वाधवान' प्रकरण हे गंभीर आहेच, पण या प्रकरणामुळे राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्व महत्त्वाच्या कामावर पाणी फेरावे असे काही नाही, असे सामनातून म्हटले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'संबंधित अधिकारी म्हणजेच अमिताभ गुप्ता हे वाधवान यांना परवानगी स्वत:च्या अधिकारात देणार नाहीत. कोणीतरी त्यामागे आहे.' असे म्हटले होते, यावरुन कोणीतरी म्हणजे कोण ? नुसते शब्दांचे बुडबुडे का उडवता ? अशा शब्दात फडणवीस यांना सामनातून फटकारले आहे.
काय आहे वाधवान प्रकरण ?
उद्योगपती कपिल वाधवान यांना आणि त्यांच्या 23 कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्याची परवानगी गृह खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. वाधवान यांनी हे पत्र घेऊन 'लॉकडाऊन' काळात प्रवास केला होता. मात्र वाधवान कुटुंब साताऱ्यातील महाबळेश्वर येथे पोहचताच हे प्रकरण उघडकीस आले आणि राजकीय आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडू लागल्या.
दुधात मिठाचा खडा पडावा तसे हे प्रकरण
महाराष्ट्र 'कोरोना' युद्धात तन, मन, धनानं उतरला आहे. राज्यातील जनता या युद्धात सामील आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात चांगले काम सुरू असताना 'वाधवान' प्रकरण घडले. दुधात मिठाचा खडा पडावा तसे हे प्रकरण समोर आले, अशा शब्दात वाधवान प्रकरणाबाबत सामनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा...वाधवान प्रकरण : लॉकडाऊनचे नियम डावलणाऱ्यांवर गुन्हे दाखल; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती
वाधवान प्रकरण गंभीरच, पण..
'वाधवान' प्रकरण हे गंभीर आहेच, पण या प्रकरणामुळे राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या सर्व महत्त्वाच्या कामावर पाणी फेरावे असे काही नाही, असे सामनातून म्हटले आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर व्यक्त होताना, 'संबंधित अधिकारी वाधवान यांना ही परवानगी स्वत:च्या अधिकारात देणार नाहीत. कोणीतरी त्यामागे आहे.' असे म्हटले होते. यावरुन 'आता कोणीतरी म्हणजे कोण ? नुसते शब्दांचे बुडबुडे का उडवता ? महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या युद्धात उतरले असताना 'वाधवान' प्रकरण घडले. ज्यांनी हे पत्र वाधवान यांना दिले ते अमिताभ गुप्ता फडणवीस काळात नेमले गेलेले अधिकारी होते व अमिताभ गुप्ता यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास असल्यानेच फडणवीस यांनी त्यांची गृह खात्यात नेमणूक केली असावी. त्याच अधिकाऱ्याने वाधवान कुटुंबावर विशेष मेहेरबानी दाखवून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या अधिकाऱ्याचा बोलवता धनी कोण व कोणाच्या इशाऱ्यावरून त्यांनी सरकारला अडचणीत आणले, याचा खुलासा होत आहे' अशा शब्दात सामनातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फटकारले असून वाधवान प्रकरणी संशयाच्या सुईची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्याचे वातावरण राजकारण करण्याचे नाही...
''वाधवान' मंडळींनी कोणत्या पक्षांना कशा देणग्या दिल्या व कसे कोणाला पोसले याच्या खोलात गेले तर अनेकांची बोलती कायमची बंद होईल. सरकारच्या प्रतिमेस तडे देण्यासाठी विरोधी पक्षाने इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये. सध्याचे वातावरण राजकारण करण्याचे नाही. राजकारणासाठी पुढे भरपूर वेळ मिळणार आहे' अशी पुस्ती जोडत वाधवान प्रकरणावरुन सामनातून एका नव्या विषयाला तोंड फोडले आहे.
हेही वाचा....#coronavirus : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्याची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये
विरोधी पक्षाने त्यांचे प्रश्न केंद्राला विचारावेत...
अमिताभ गुप्ता यांनी राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. यावरुन विरोधी पक्षांना सामनातून सुनावण्यात आले आहे. 'पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांना ‘वाधवान’ प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले. ते भारतील प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याने पुढची कारवाई केंद्र सरकारने करायला हवी. त्यामुळे केंद्र सरकार वाधवान प्रकरणी काय करते आणि पोलीस अधिकारी गुप्ता यांचा खरा सूत्रधार कोण, हे मौलिक प्रश्न महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाने केंद्र सरकारला विचारायला हवेत' असा सल्ला विरोधी पक्षाला सामनातून देण्यात आला आहे.
विरोधकांचे 'वाधवान’ प्रकरणाचे कारस्थान शिजले नाही...
'महाराष्ट्र कोरोना युद्धात तन, मन, धन अर्पून उतरला आहे. राज्यातील जनता या युद्धात सामील आहे. विरोधकांनी पेटवलेल्या वेगळ्या चुलीवर वाधवान प्रकरणाचे कारस्थान शिजले नाही. त्यांचे वैफल्य समजून घेऊन सरकारने पुढच्या कामास लागावे हेच उत्तम. तेच राज्याच्या हिताचे आहे' अशा शब्दात सामना संपादकीयातून विरोधी पक्षांना टोला लगावण्यात आला आहे.