मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्रात रुग्णांची आणि मृत्यूची संख्या लपवली जात आल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता. पण राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. तसेच भाजप शासित राज्यात आकड्यांची लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
काय म्हटलं अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये -
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य असल्याने आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे, यात दुमत नाही. पण महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक सच्चा मराठी नागरिक म्हणून मला किमान हे समाधान आहे की, माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही. शासकीय नोंदीमध्ये मृतकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत ठेवून स्मशानात रात्रंदिवस जळणाऱ्या डझनोगणती चिता लपवण्यासाठी पत्रे ठोकण्याचे पाप महाराष्ट्राने केले नाही.
फडणवीस यांच्याकडून अपेक्षा -
अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग आहे, लाकडे नाही, जागा नाही म्हणून शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडून देण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी किंवा ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्यावर बोलाल तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची, संपत्ती जप्त करण्याची धमकी महाराष्ट्राने नागरिकांना दिली नाही. हे सारे प्रकार ज्या राज्यात घडले, तिथे भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फडणवीस यांनी एखादे खरमरीत पत्र लिहिले तर त्यातून तिथल्या राज्य सरकारांच्या कामात सुधारणा होईल आणि कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.