मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे यंदाचा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने, पालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी - navratri news
‘कोविड - 19’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच राज्य शासनाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवादरम्यान देण्यात आलेल्या सूचना व कार्यपद्धतीनुसार आहेत.
‘कोविड - 19’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच राज्य शासनाद्वारे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना गणेशोत्सवादरम्यान देण्यात आलेल्या सूचना व कार्यपद्धतीनुसार आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने मूर्तीकारांना मंडप उभारण्याची परवानगी देण्याविषयी अधिक सुलभ कार्यपद्धती आणि ‘कोविड’ संदर्भातील हमीपत्र इत्यादी बाबींचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक मंडळांसाठी कमाल 4 फूट, तर घरगुती देवींच्या मूर्तींची उंची दोन फुटांच्या मर्यादेत असावी. त्याचबरोबर देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी आणि सर्व मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यासह सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी हात वारंवार साबणाने धुणे, सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’चा योग्यप्रकारे वापर करणे आणि दोन व्यक्तिंमध्ये किमान दोन मीटरचे अंतर राखणे; या ३ नियमांची आपापल्या स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व शासनाद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणा-या विविध मार्गदर्शक सुचनांचे अत्यंत काळजीपूर्वक व काटेकोरपणे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन संबंधित महापालिका उप आयुक्त हर्षद काळे यांनी केले आहे.
मंडप परवानगीची माहिती
गणेशोत्सवादरम्यान गणपती मूर्ती तयार करण्यासाठी उभारावयाचे तात्पुरते मंडप (मूर्तीकारांचे मंडप) उभारण्याबाबतच्या यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचना नवरात्र व अन्य उत्सवांदरम्यानही लागू राहणार असल्याचे संबंधित परिपत्रकात यापूर्वीच नमूद करण्यात आले आहे. तसेच 29 सप्टेंबर, 2020 नुसार मार्गदर्शक सूचना शासनाकडूनही प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने दिनांक 30 सप्टेंबर 2020 पासून मूर्तीकारांच्या मंडपांना शुल्क आकारुन परवानगी देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मूर्तीकारांच्या मंडपांसाठीचे अर्ज स्वीकारण्यास असलेला कमी अवधी व कोरोना साथरोग प्रतिबंधक उपाययोजनात पोलीस यंत्रणेची व्यस्तता विचारात घेता, यावर्षी परवानगी देण्याच्या पद्धतीत अंशतः बदल करण्यात येत आहेत. मागील वर्षी ज्या मूर्तीकारांना परवानगी दिली आहे, अशा मूर्तीकारांचे अर्ज यावर्षी स्थानिक, वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची पोलीस परवानगी ग्राह्य धरुन अतिक्रमण कार्यालयातर्फे छाननी करुन त्यांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, नव्याने व प्रथमतः अर्ज करणा-या मूर्तीकारांच्या अर्जांची छाननी पूर्वीप्रमाणेच स्थानिक, वाहतूक पोलीस तसेच विभाग कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
‘कोविड-१९’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बाबींबाबत मूर्तीकारांकडून मंडप उभारणी अर्जासह हमीपत्र घेण्यात येत आहेत. हे हमीपत्र गणेशोत्सवादरम्यान प्रसारित केलेल्या हमीपत्रानुसार असल्याने यासंबंधी नमुना नवरात्रोत्सावासाठीही ग्राह्य धरण्यात येत आहे. अर्ज सादर करणा-या मूर्तीकारास कोविड संदर्भातील हमीपत्र विभाग कार्यालयामार्फत देण्यात येत असून, ते मूर्तीकाराकडून स्वाक्षरीसह घेण्यात येत आहे. विभाग कार्यालयांनी परंपारिक मूर्तीकारांना परवानगी द्यावी व अन्यत्र तयार केलेल्या मूर्ती निव्वळ विक्रिसाठी मंडप उभारण्याची परवानगी देऊ नये, असेही या परिपत्रकात अंतर्भूत करण्यात आले आहे.