मुंबई- शिवरायांचा वारंवार अवमान करणाऱ्या भाजपविरोधात आज (दि.14 जानेवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
भाजपच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी प्रेमातून 'आजके शिवाजी;नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यानंतर सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून मोदी सरकारला मोठ्या टिकेला सामोरे जावे लागत आहे. शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचे सांगत महाविकास आघाडीने देखील याचा तीव्र निषेध केला. तसेच अन्य स्तरांतूनही शिव भक्तांनी या विरोधात आवाज उठवला आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने राज्यभरात आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपतींच्या नावाने मतं मागून भाजप सत्तेवर आले. याच भाजपकडून आता शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. या आधीही अजयकुमार बिश्त आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी करण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले. तसेच आताही 'आजके शिवाजी:नरेंद्र मोदी' या पुस्तकातून छत्रपतींचा अवमान केल्याचे त्यांनी म्हटले.
व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून देशाला वेठीस धरणारे तसेच धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या भूमिका घेणाऱ्या नरेंद्र मोदींची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही, असे थोरात म्हणाले. छत्रपतींनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. नरेंद्र मोदी मात्र जाती-धर्मात तेढ आणि विद्वेषाचे काम करत आहे. त्यामुळे महाराजांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले.
शिवस्मारकातही घोटाळा करणाऱ्या भाजपला खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.